राज्यात नऊ महिन्यांत ६७ जणांचा बुडून मृत्यू

अग्निशामक दलाकडून माहिती : सर्वाधिक घटना पणजीतील

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
राज्यात नऊ महिन्यांत ६७ जणांचा बुडून मृत्यू

पणजी : गेल्या काही दिवसांत राज्यात समुद्र, नदी किंवा अन्य पाणथळ ठिकाणी मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ६७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये आत्महत्या केलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. दरम्यान, सर्वाधिक १० घटना पणजी आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. अग्निशामक दलाकडून ही माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरील कालावधीत अग्निशामक दलाला बुडण्याच्या घटनांबाबत १०८ कॉल आले होते. यामध्ये ६७ जणांचा बुडून मृत्यू झाला तर ४ जणांना वाचवण्यात यश आले. पाण्यात पडलेल्या ४ जनावरांना वाचवण्यात देखील दलाला यश आले होते. दलाला आलेल्या एकूण कॉलपैकी पणजीनंतर जुने गोवे, मडगाव आणि सावर्डेमधून कॉल आले होते. या भागातून बुडण्यासंबंधी प्रत्येकी ५ कॉल आले होते.

यानंतर लोटली, मुळगाव, केपे येथे बुडून मृत्यू झाल्याच्या प्रत्येकी ४ घटना घडल्या होत्या. चिंचणी, म्हापसा, पेन्हा दी फ्रांका आणि ताळगाव येथून प्रत्येकी एक घटना घडल्या होत्या. तर हणजूण, असोळणा, कळंगुट, काणकोण, कुडतरी, कांदोळी, करमळी, दुर्भाट, शिरदोन, गांजे येथे बुडून मृत्यू पावण्याच्या प्रत्येकी २ घटनांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी ते मे या उन्हाळी महिन्यात पोहायला गेलेल्या २७ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

७७ टक्के मृत्यू बुडून

जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात राज्यात विविध आपत्कालीन परिस्थितीत ८६ जणांना मृत्यू आला होता. यातील ६७ म्हणजेच ७७ टक्के मृत्यू हे बुडून झाले होते. वरील कालावधीत अग्निशामक दलाला ४०५ व्यक्ती तर ५४३ जनावरांना वाचवण्यात यश आले.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १३ मृत्यू

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील ९ महिन्यांत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १३ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. यानंतर जुलैमध्ये ११, ऑगस्ट आणि मे मध्ये प्रत्येकी ९, एप्रिलमध्ये ८, फेब्रुवारीत ६, जून आणि मार्चमध्ये प्रत्येकी ४ तर जानेवारी महिन्यात ३ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. 

हेही वाचा