मद्यधुंद कारचालकाचा हरमल किनाऱ्यावर धुमाकूळ

दोघे जण बचावले : ग्रामस्थांतून संताप

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
05th July, 09:04 pm
मद्यधुंद कारचालकाचा हरमल किनाऱ्यावर धुमाकूळ

हरमल : येथील किनाऱ्यावर मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकांनी भरधाव वेगात कार हाकून किनाऱ्यावरील पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. दोघे जण यात सुदैवाने बचावले.

गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जी.ए. ०४ एच ०४७१ या बलेनो कारचालकाकडून किनाऱ्यावर थरार पाहण्यास मिळाला. फामापा पॉईंटकडून किनाऱ्यावर उतरल्यानंतर भरधाव वेगात कार टॉवर पॉईंट नजीक वाळूत थांबवली. कारमधील दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी मद्य घेतल्याचे मान्य केले. मित्राच्या आग्रहास्तव कार किनाऱ्यावर उतरवल्याचे कारचालकाने सांगितले.

किनाऱ्यावर भरधाव व बेदरकारपणे कार चालविल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. भरधाव वेगाने कार येत असल्याचे पाहून पर्यटकांनी पाण्यात धाव घेतल्याचे लोकांनी सांगितले. हे पाहून दृष्टी जीवरक्षकांनी धाव घेतली.  स्थानिकांच्या मदतीने कार थांबवली, तेव्हा दोघेही आत बसून राहिले. लोकांनी वारंवार उतरण्यास सांगूनही ते उतरले नाहीत. दोघेही चालण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र, पोलीस आल्यानंतर त्यांनी कारचा दरवाजा उघडला. पोलीस उपनिरीक्षक दिवकर व अन्य पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, किनाऱ्यावर अनेक वेळा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवित असल्याने पर्यटकांना धोक्याचे बनते. त्यासाठी किनाऱ्यावर पोलीस तैनात करण्याची मागणी पंच सदस्य संतान फर्नांडिस व ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा