कोलवाळ हिट अँड रन : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृध्दाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th July, 04:34 pm
कोलवाळ हिट अँड रन : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृध्दाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

म्हापसा : कोलवाळ येथे मॉर्निंग  वॉक करतांना अज्ञात वाहनाने मागून ठोकरल्याने आकय म्हापसा येथील विनायक विठू धारगळकर (७८) याचा मृत्यू झाला. हा अपघात कोलवाळ येथील सर्विस रोडवर गुरुवारी ४ जुलै रोजी पहाटे ६:४० दरम्यान घडला होता. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या धारगळकर यांना आधी म्हापसा इस्पितळात दाखल केले. तेथून त्यांना गोमेकॉत हलवण्यात आले. 

संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कोलवाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी प्रथमदर्शी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले. शुक्रवारी 5 रोजी सकाळी मयताच्या मृतदेहावर गोमेकॉत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी डॉक्टरांना मयताच्या शरीरावर काही जखमा आढळल्या. या जखमा वाहनाची धडक बसून झाल्याचे नंतर स्पष्ट झाले.

शवविच्छेदन अहवालामुळे हे हिट अ‍ॅण्ड रन अपघात प्रकरण असल्याचे उघडकीस आले. निष्काळजीपणे वाहन हाकून पादचार्‍याला धडक देणे व नंतर जखमीला वैद्यकिय उपचार देण्याचा प्रयत्न न करणे, किंवा पोलिसांना माहिती न देता पळून जाणे, अशा गुन्ह्याखाली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.    


हेही वाचा