आजपासून गुड्डू विरुद्ध कालिन भैयाचा ‘भौकाल’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 12:23 am
आजपासून गुड्डू विरुद्ध कालिन भैयाचा ‘भौकाल’


हा आठवडा खऱ्या अर्थाने चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. एकीकडे ओटीटीवर गुड्डू भैया आणि कालिन भैया एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तर चित्रपटगृहात आपल्याला अजय देवगण आणि नवा चेहरा लक्ष आपल्याला अॅक्शन करताना दिसणार आहेत. मनोरंजनाने भरपूर असलेल्या या आठवड्यात मिर्झापूर ३ सह ‘और में कहाँ दम था’ आणि ‘किल’ चित्रपटगृहात झळकणार आहेत.


मिर्झापूर सीझन ३ (ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ)
ओटीटीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका मिर्झापूरचा तिसरा सिझन शुक्रवारी प्रकाशन ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर झळकणार आहे. जिथे दुसरा भाग संपला तेथूनच तिसरा भाग सुरू होणार आहे. मुन्ना भैय्याला मारल्यानंतर गुड्डूने मिझापूरच्या गादीवर कब्जा केला. दरम्यान, कालीन भैयाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि आपले सिंहासन परत मिळविण्यासाठी नवीन युती बनविली आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन ॲक्शन, थ्रिल आणि ड्रामाने परीपूर्ण असा असणार आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर गारुड निर्माण करते की नाही हे पहावे लागेल.


औराे में कहां दम था (थिएटर्स)
दृश्यम २ मध्ये एकत्र काम केलेले अजय देवगण आणि तब्बू, चित्रपट निर्माता नीरज पांडे यांच्या रोमँटिक थ्रिलर, औरों में कहाँ दम था साठी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात कृष्णा आणि वसुधा यांची कथा दाखविली गेली आहे. कृष्णा खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दोन दशकांनंतर, कृष्णाची तुरुंगातून सुटका होते. त्यानंतर तो वसुधाला भेटतो, जिचा विवाह आता अभिजीतशी (जिमी शेरगिल) झाला आहे. कृष्णा-वसुधाच्या भूतकाळाचा त्यांच्या वर्तमानावर काय परिणाम होतो, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात शंतनू महेश्वरी आणि सई मांजरेकर यांनी भूतकाळातील कृष्ण आणि वसुधाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक निरज पांडे नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे ओळखला जातो. त्यामुळे हा चित्रपटही त्याच धाटणीतील ठरणार की नाही हे पहावे लागेल.


किल (थिएटर्स)
निखिल नागेश भट यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या किलमध्ये नवोदित अभिनेता लक्ष्य आपल्याला अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात लक्ष्य हा आर्मी कमांडो अमृतच्या मुख्य भूमिकेत आहे. जो त्याची प्रेयसी तुलिकाचे रक्षण करण्यासाठी ट्रेनमध्ये चढतो आणि ती ट्रेन रणांगणात बदलते. करण जोहर निर्मित, आगामी चित्रपटात राघव जुयाल आणि तान्या माणिकतला देखील प्रमुख भूमिकेत आहेत.


गोयो (नेटफ्लिक्स)
गोयो हा एक रोमँटिक चित्रपट आहे. जो एका तरुण ऑटिस्टिक संग्रहालय मार्गदर्शकाच्या जीवनाच्या अवतीभवती फिरतो. जो कठोर दैनंदिन दिनचर्या पाळतो, परंतु जेव्हा तो एका सहकर्मीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो स्वतःच्या दिनचर्या पाळण्यासाठी धडपडतो. मार्कोस कार्नेवाले लिखित आणि दिग्दर्शित, आगामी चित्रपटात निकोलस फर्टाडो, नॅन्सी डुप्ला आणि सोलेदाद विलामिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


आर्थर द किंग (लायन्सगेट प्ले)
आर्थर द किंग हा एक साहसी खेळावर आधारीत चित्रपट आहे. यामध्ये मार्क वाहलबर्ग, सिमू लिऊ आणि ज्युलिएट रायलेन्स यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाचे कथानक एक अयशस्वी खेळाडू आणि त्याच्या संघाभोवती फिरते. ज्यांचे एका घटनेनंंतर नशीब धक्कादायक वळण घेते. आर्थर नावाचा कुत्रा त्यांच्या संघात सामील होतो आणि त्यांना मैत्री, निष्ठा आणि चिकाटीचे दर्शन घडवतो.


डिस्पिसेबल मी ४ (थिएटर्स)
डिस्पिसेबल मीचे निर्माते आणखी एक रोमांचक भाग घेऊन परतले आहेत. जो ग्रूवर केंद्रित आहे. जो त्याच्या कुटुंबात नवीन आलेल्या सदस्यामुळे आनंदी आहे. मात्र जेव्हा त्याला कळते की मॅक्सिम ले माल तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे आणि ग्रू आणि त्याच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड व्हॅलेंटिनाची मदत घेत आहे. त्यानंतर चित्रपटात वेगळे वळण येते.
द इमॅजनरी (नेटफ्लिक्स)
शुक्रवारी द इमॅजिनरी नावाचा मनोरंजक ॲनिमेटेड चित्रपट देखील ओटीटीवर दाखल होत आहे. चित्रपटाचे कथानक अमांडा नावाच्या एका तरुणीच्या अवतीभोवती फिरते जिचा तिचा काल्पनिक मित्र रुजरसोबतचा साहसी प्रवास, ते दोघे विभक्त झाल्यावर अनपेक्षित वळण घेतो.
बिजोया (हॉयचॉय)
बिजोया हे एक भावनाप्रधान मालिका आहे, जी एका महिलेभोवती केंद्रित आहे, जी उच्च शिक्षणासाठी एका छोट्या गावातून मोठ्या शहरात गेल्यानंतर काही आठवड्यांनंतर, आपल्या किशोरवयीन मुलाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील सत्य शोधण्याच्या मोहिमेवर निघते. या मालिकेत स्वस्तिका मुखर्जी, देबदत्त राहा आणि साहेब चट्टोपाध्याय प्रमुख भूमिकेत आहेत.
मल्याळी फ्रॉम इंडिया (सोनीलिव्ह)
हा मल्याळम चित्रपट आलपरंबिल गोपी या तरुणाच्या कथेवर आधारीत आहे. जो आपले गाव सोडतो आणि एका नवीन प्रवासाला निघतो. त्यामुळे शेवटी त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. डिजो जोस अँटोनी दिग्दर्शित, या चित्रपटात निविन पॉली, ध्यान श्रीनिवासन, अनस्वरा राजन, दीपक जेठी आणि शाइन टॉम चाको यांच्या भूमिका आहेत.


ही वेंट दॅट वे (जीओ सिनेमा)
सिरीयल किलर लॅरी ली रॅन्सवरील एका सत्य घटनेवर आधारित, हा चित्रपट आहे. जो जिम गुडविन नावाच्या ख्यातनाम प्राणी प्रशिक्षकाभोवती केंद्रित आहे. जो एका तरुण हिचहायकरला आपल्यासोबत आणतो. मात्र नंतर तो सीरियल किलर बनतो. जेकब अॅलॉर्डी आणि जॅचरी क्विंटो यांच्या मुख्य भूमिका आहेत.


डेस्परेट लाईज (नेटफ्लिक्स)
अँजेला चॅव्हस दिग्दर्शित ही ब्राझिलियन मालिका एका मध्यमवयीन विवाहित महिलेला भोवती फिरते. जिचे साधे सरळ जीवन गर्भवती झाल्यावर विस्कळीत होते. ती गुपित लपविण्याचा प्रयत्न करते, परंतु काळाबरोबर गोष्टी अधिक क्लिष्ट होत जातात. या मालिकेत ज्युलियाना पेस, व्लादिमीर ब्रिक्टा आणि फेलिप अबीब यांच्या प्रमुख आहेत.