हा वर्ल्ड कप सगळ्या भारतीयांचा

रोहित शर्मा : विश्वविजेत्या टीम इंडियाचे मायदेशात जल्लोषी स्वागत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th July, 12:18 am
हा वर्ल्ड कप सगळ्या भारतीयांचा

मुंबई : भारतीय संघासाठी ४ जुलै हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला. दिल्लीच्या विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत संपूर्ण देश हा टीम इंडियामय झाला. ढोल ताशाच्या गजरात सेलिब्रेशन करताना ना टीमचा ना चाहत्यांचा उत्साह कमी झाला. त्यात वरूण राजाची उपस्थिती चार चांद लावून गेली. विश्वविजेता भारतीय संघ खास बसमधून विक्टरी परेड काढण्यात आली.

नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम हा परीसर लाखाे चाहत्यांनी फुललेला होता. त्यानंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाला. त्यावेळी रोहित शर्माची एक खास मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी रोहित शर्माने आपली भावना व्यक्त केली. यावेळी त्याने हा विश्वचषक केवळ संघाचा नाही, तर तमाम भारतीयांचा आहे, असे सांगून सर्व चाहत्यांची मने जिंकली. वानखेडेवर झालेल्या खास समारंभात भारतीय संघाला १२५ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
रोहित शर्मा वानखेडे स्टेडियमध्ये म्हणाला की, जेव्हापासून आम्ही वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये दाखल झालो आहोत, तेव्हापासून अविस्मरणीय अनुभव आम्हाला येत आहेत. चाहत्यांनी मनापासून आमच्यावर अलोट प्रेम केले आहे. खरे तर हा वर्ल्ड कप भारतीय संघाचा नाही तर ही ट्रॉफी आपल्या संपूर्ण देशाची आहे. मी सर्वांत सुदैवी माणूस आहे. कारण मला असा चांगला संघ लाभला. या संघाने अथक मेहनत घेतली. आज सकाळी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आमच्या सर्वांसाठी हा सुखद अनुभव होता. भारतीय संघाच्यावतीने मी संपूर्ण देशाचे आभार मानतो. कारण त्यांनी नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला. कधीही त्यांनी आम्हाला निराश केले नाही. त्यामुळे या विश्वविजयात देशाचा आणि चाहत्यांनचाही महत्वाचा वाटा आहे.
रोहित शर्माने हा वर्ल्ड कप फक्त भारतीय संघाचा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे, असे म्हणत सर्व चाहत्यांची मनं जिंकली. कारण एखाद्या कर्णधाराने संघाचे कौतुक केले असते. पण रोहितने यावेळी फक्त संंघाचे, खेळाडूंचे कौतुक केले नाही. रोहित यावेळी देशाचे आणि देशवासियांचे आभार मानायला विसरला नाही.
रोहित शर्मा हा असा एकमेव खेळाडू आहे, जो २००७ साली झालेल्य वर्ल्ड कपच्या विजयातही होता. त्यानंतर २०२४ साली तर रोहित हा कर्णधार होता. पण या दोन वर्ल्ड कपमध्ये असलेला रोहित हा एकमेव भारताचा खेळाडू ठरला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक आणि १३ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी गुरुवारी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. २००७ रोजी भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरदेखील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे अशी मिरवणूक काढली गेली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे स्वागत मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात केले होते.
ज्या मैदानावर हिणवले, त्याच मैदानावर हार्दिक नावाचा जयघोष
जगज्जेत्या संघाला भेटण्याकरता वानखेडे स्टेडिअमवरही गर्दी जमली होती. वानखडेवरील चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या नावाचा जयघोष केला. दोन महिन्यांपूर्वी याच वानखेडेवर आयपीएल मॅचदरम्यान हार्दिक पांड्याच्या खेळावरून त्याला डिवचण्यात आले होते. त्याच्यावर सर्व स्तरांतून टीका केली जात होती. परंतु, आता टी २० वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वोत्तम कामगिरी केल्याने त्याचं कौतुकही केले जात आहे.
दरम्यान, मुंबईत येण्याआधी त्याने एक ट्वीट केले होते. त्यात त्याने वानखेडे, सी यू सून असे म्हटले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला होता.


पंतप्रधानांनी केले विश्वविजेत्या संघाचे स्वागत
भारताने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी सकाळी (४ जुलै) दिल्लीत दाखल झाला. टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेतील विजयानंतर भारतीय संघाचे दिल्लीतही जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी दिल्ली विमानतळावर क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल होत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. जवळपास एक ते दीड तास पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संघाबरोबर संवाद साधला.
भारतीय संघाने २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला होता. तब्बल १७ वर्षांनंतर भारताने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. त्यामुळे संपूर्ण भारतात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आता भारतीय संघ भारतात दाखल झाल्यानंतर आधी दिल्लीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला होता. जगज्जेत्या संघाकडून दिल्लीत हा केक कापण्यात आला.

पंतप्रधानांची खिलाडूवृत्ती
पंतप्रधान मोदींनी स्पेशल ‘चॅम्पियन’ जर्सी घातलेल्या खेळाडूंबरोबर फोटोही क्लिक केले. फोटो सेशन दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वतः हातात घेतली नाही, तर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हात धरला. ही खूप छोटी गोष्ट आहे, पण पंतप्रधान मोदींच्या या कृतीत जगविजेत्या भारतीय संघाच्या मेहनतीचा आणि आयसीसी ट्रॉफीच्या सन्मानाचा आदर दिसून येतो. मोदींची ही कृती सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. भारतीय पंतप्रधानांच्या ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’चे लोक कौतुक करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफी ही खेळातील कर्तृत्वाची शिखरे दर्शवते. ट्रॉफीला समृद्ध इतिहास आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे घाम गाळतात. रात्रंदिवस सराव करतात. हाय-व्होल्टेज दबावाच्या वातावरणाचा सामना करून ट्रॉफी जिंकली जाते, अशा परिस्थितीत ज्यांनी ट्रॉफी जिंकली आहे त्यांचाच त्यावर अधिकार आहे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने पकडणे किंवा स्पर्श करणे, हे त्या खेळाडूंच्या मेहनतीची छेडछाड करण्यासारखे आहे. बीसीसीआने टीम इंडियाची नवी टी २० जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली. या जर्सीवर नमो असे नाव लिहिले होते. याचबरोबर बीसीसीआयने या जर्सीला क्रमांक देखील दिला होता.