म्हापसा बस स्थानकावर दिड लाखांचे पनीर जप्त; एफडीएची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 04:36 pm
म्हापसा बस स्थानकावर दिड लाखांचे पनीर जप्त; एफडीएची कारवाई

म्हापसा : आंतरराज्यीय प्रवासी आणि खासगी मालवाहू वाहनांतून होणारी खाद्यपदार्थांची वाहतुक रोखण्याच्या मोहिमेंतर्गत अन्न व औषधे प्रशासनाने म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर गुरूवारी छापा टाकला. महाराष्ट्रातील सांगली व चिकोडीतून आलेला सुमारे ५०० किलो वजनाचा पनीर जप्त केला. या पनीरची सुमारे दिड लाख रूपये किंमत आहे. हा माल सासष्टी व बार्देश तालुक्यातील किनारपट्टीतील आस्थापनांसाठी मागवण्यात आला होता.  

बुधवारी ३ जुलै रोजी अन्न व औाषधे प्रशासनाने मडगाव येथे काही आस्थापनांची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये लेबल नसलेले पनीर सापडले होते. दरम्यान पनीरची ही खेप शेजारील राज्यातून खासगी वाहनातून म्हापशात आली व तेथून त्याचा सर्वत्र पुरवठा झाल्याची माहिती चौकशीवेळी उघड झाली होती. 

माहितनुसार गुरूवारी ४  रोजी पहाटेच्या सुमारास प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी म्हापसा आंतरराज्य बस स्थानकावर पाळत ठेवली. एक खासगी मालवाहू रिक्षा टेंपो येताच अन्न व औाषधे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली. तपासणीदरम्यान सुमारे २०० किलो पनीर सापडले. त्यानंतर प्रशासनाने काही प्रवासी बसची पाहणी केली. तेव्हा या बस मध्येही अंदाजे ३०० किलो पनीर सापडले. हा सर्व माल अधिकार्‍यांनी जप्त केला. नंतर म्हापसा नगरपालिकेच्या सहाय्याने या सर्व मालाची विल्हेवाट लावण्यात आली. 

प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नारोन्हा यांनी दिलेल्या महितीनुसार; जप्त केलेली पनीरची खेप सांगली व चिकोडी मधून आली होता. माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी कारवाई केली. व्यावसायिक तसेच पुरवठादारांकडून नियमांचे पालन व्हावे व चांगल्या मालाचा पुरवठा, हा या नियमित कारवाई मागचा हेतू आहे. 

 हा प्रकार बंद व्हावा यासाठी दुध तसेच इतर अन्न पदार्थांच्या गोव्यात होणार्‍या वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशी आम्ही महाराष्ट्र व कर्नाटकाच्या अन्न व औषधे प्राधिकरणाकडे संपर्क साधून विनंती करणार आहोत. तसेच कार्गोचा व्यवसाय करणार्‍या बस ऑपरेटर्सना स्टोरेजची योग्य व्यवस्था करून व रितसर परवाना घेऊनच हा व्यवसाय करण्याचे निर्देश दिले जाईल, असे नोरोन्हा यांनी सांगितले.     

अन्न व औषधे प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी राजाराम पाटील व शैलेश शेणवी, अन्न सुरक्षा अधिकारी प्रितम परब, प्रदीप पार्सेकर व साईनाथ या पथकाने ही कामगिरी केली.