पणजी : येत्या १९ डिसेंबर रोजी गोवा राज्य १०० टक्के साक्षर असल्याची घोषणा केली जाईल. यासाठी शिक्षण खात्यातर्फे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकर, एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या गोव्यात साक्षरतेचे प्रमाण ९८ टक्क्यांहून अधिक आहे. गोवा १०० टक्के साक्षर बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानुसार सुमारे तीन हजार जेष्ठ नागरिकांना आम्ही प्रशिक्षण दिले आहे. यातील ७०० जण परीक्षा उत्तीर्ण होऊन साक्षर झाले आहेत. येत्या १४ जुलैला उरलेल्या २३०० लोकांची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा नजीकच्या पंचायत गृहात होईल. या सर्व लोकांनी परीक्षेत उपस्थित राहावे अशी आमची विनंती आहे.
ते म्हणाले, सध्या सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यातील काही भागात थोडे निरक्षर लोक उरले आहेत. त्यांना शिकवण्यासाठी एससीईआरटीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा लोकांना शिकवण्यात ज्यांना रस आहे त्यांनी एससीईआरटीकडे संपर्क साधावा. आम्ही अशा प्रशिक्षकांना मानधन देणार आहोत. याशिवाय स्वयंपूर्ण मित्र तसेच पंचायतींनी त्यांच्या भागातील निरक्षर व्यक्ती शोधून त्यांना प्रशिक्षित करावे. किंवा त्यांची नावे २ ऑक्टोबर पर्यंत शिक्षण खात्याकडे द्यावीत.