कोन्सुआ-कुठ्ठाळी येथे मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळली ७०-८० झाडे

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 04:08 pm
कोन्सुआ-कुठ्ठाळी येथे मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळली ७०-८० झाडे

वास्को:  कुठ्ठाळी पंचायत क्षेत्रातील कोन्सुआ येथे रविवारी सकाळी वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या पाच मिनिटात सुमारे ७० ते ८० मोठी झाडे उन्मळून पडल्याने स्थानिकामध्ये घबराट निर्माण झाली आहे.काही मातीच्या घरांचीही मोडतोड झाली व  वीजप्रवाह खंडित झाला, याप्रकरणी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनीही सदर घटनेबद्दल आश्र्चर्य व्यक्त केले.अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच घडली नसल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले. या घटनेमुळे कोन्सुआ- मायणा या रस्त्यावरील वाहतुक काही काळासाठी ठप्प झाली. अग्निशमन दलाने रस्त्यावरील झाडे व इतर अडथळे हटविल्याने रस्ता खुला झाला.

रविवारी सकाळी कोन्सुआ येथे जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे एकापाठोपाठ उन्मळून पडली. तेथील मातीच्या घराच्या छप्परावरील पत्रे, कौले उडून दूरवर प़डले. वीज तारांवर काही झाडे पडल्याने त्या तुटून रस्त्यावर पडल्या.त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला. आमदार वास यांनी कुठ्ठाळीच्या सरपंच सानिया परेरा यांच्यासह एकंदरतीत परिस्थितीचा आढावा घेतला.तेथील मातीच्या घरांच्या छप्परावरील कौले, पत्रे उडाल्याने पाण्याने मतीच्या भिंती फुगुन घरच जमीनदोस्त होण्याची भीती होती. त्यामुळे आमदार वास यांनी धावपळ करीत तेथील घरांच्या छप्परावर ताडपत्री घालुन घेतली. 

याप्रकरणी अग्निशमन दल, वीज खात्याला कळविण्यात आल्यावर ते त्वरित त्या ठिकाणी आले. वीज खात्याच्या कामगारांनी भर पावसातच दुरुस्तीचे काम हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी धावपळ करीत तेथील रस्त्यावरील झाडे, फांद्या हटविल्यात. आमदार वास हे भरपावसात उभे राहून कामावर लक्ष ठेवत होते. काही झाडे अद्याप उन्मळून पडण्याची शक्यता आहे. ही झाडे एका बाजूला झुकली आहेत. याप्रकरणी आपण सबंधितांना योग्य सुचना केल्या असल्याचे आमदार वास यांनी सांगितले. 

हेही वाचा