करंझोळ भागातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयावर मोर्चाचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 11:19 pm
करंझोळ भागातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

वाळपई : सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागाकडे वीज खाते दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतो. चार -चार दिवस याकडे लक्षही दिले जात नाही. सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ येथे गेल्या चार दिवसांपासून या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. पंचायत सदस्य यशोदा गावकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वाळपई वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

चार दिवसांपासून करंझोळ भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो सुरळीत करण्यासाठी वीज खात्याकडून लक्ष देण्यात आले नाही. वीज खाते २४ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन देत आहे. मात्र, हे आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे. एका बाजूने भरमसाठ येणारी बिले तर दुसऱ्या बाजूने अखंडीत वीज पुरवठा यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हाल सहन करावे लागत आहे. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे. केबल घालण्याचे काम व्यवस्थितपणे होत नाही. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत नाही.

वाळपईतील अधिकाऱ्याशी संपर्क साधून तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या तक्रारीची अजूनपर्यंत दखल घेण्यात आली नाही. सध्या केबल घालण्याचे काम सुरू आहे. या कामाला अजूनपर्यंत गती मिळालेली नाही. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

यशोदा गावकर यांनी सांगितले की, सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मुलांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

स्थानिक आमदार तथा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना याविषयी सांगण्यात आले आहे. वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांच्याशी त्यांनी चर्चा करुन गावाला खंडित वीज पुरवठ्यापासून मुक्तता द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

केबल घालण्याचे काम निकृष्ट

या भागांमध्ये केबल घालण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी वापरण्यात येणारी वाळू निकृष्ट दर्जाची आहे. अशाच प्रकारे काम सुरू राहिल्यास येणाऱ्या काळात सदर केबल लवकरच खराब होणार आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.