प्रवाह समितीच्या पाहणीनंतर कर्नाटकचे पितळ उघडे - मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th July, 04:19 pm
प्रवाह समितीच्या पाहणीनंतर कर्नाटकचे पितळ उघडे - मुख्यमंत्री

पणजी : कर्नाटकने म्हादईचा प्रवाह वळवला आहे हे समजण्यासाठी म्हादईची भर पावसात पाहणी होणे अत्यंत आवश्यक होते. सध्या प्रवाह समितीतर्फे अशी पाहणी सुरू असून यामुळे कर्नाटकचे पितळ उघडे पडणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मुख्यमंत्री म्हणाले की, कर्नाटकने म्हादई नदीचा प्रवाह वळवल्याने पाणी मलप्रभा नदीमध्ये जात आहे हे पावसाळ्यात समजणे सोपे आहे. यासाठीच आम्ही नेहमी पाऊस असतानाच पाहणी करण्याची मागणी करत होतो. कर्नाटकने कालवे खोदून म्हादईचे पाणी मलप्रभेपर्यंत नेले आहे हा आमचा दावा अजूनही कायम आहे. याचे पुरावे देखील आमच्या जवळ आहेत. 

ते म्हणाले, याशिवाय आम्ही या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातही लढत आहोत. प्रवाह समितीच्या पाहणीचा आम्हाला तिथे देखील फायदा होऊ शकतो. विरोधक पंतप्रधानांना जाऊन याविषयी भेटले आहेत. मात्र आम्ही त्याआधीच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना गोव्यासाठी म्हादई नदी का आणि कशी महत्वाची आहे हे समजावून सांगितले आहे. त्यामुळे गोव्याला विश्वासात घेऊनच या बाबतीतला निर्णय घेतला जाईल.

म्हादईच्या बाबतीत गोव्यावर कधीच अन्याय होणार नाही. आम्ही हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात नेल्यानेच प्रवाह समितीची स्थापना करण्यात आली होती. सध्या काही विरोधक या विषयावरून आमच्यावर टीका करत आहेत. पण त्यांचे सरकार असतानाच म्हादईवर अन्याय झाला होता. विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित या गोष्टी माहिती नसाव्यात. त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांनी म्हादई कशी विकली होती याबाबतच्या  उपलब्ध असलेल्या फाईल पाहाव्यात असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


हेही वाचा