फोंड्याला पावसाने झोडपले; दोन ठिकाणी कोसळली दरड, वाहतूक ठप्प

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 03:29 pm
फोंड्याला पावसाने झोडपले; दोन ठिकाणी कोसळली दरड, वाहतूक ठप्प

फोंडा: रविवारी सकाळ पासून कोसळलेल्या मुसळधार पावसात कोने - प्रियोळ येथे दरड कोसळली. यामुळे अंदाजे ३ तास फोंडा ते म्हार्दोळ पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली. तसेच गटार तुंबल्याने म्हार्दोळ येथील पंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या दोन घरात पाणी शिरून नुकसान झाले. तसेच म्हाळशी - कुर्टी येथे रस्त्यावर दरड कोसळण्याचा प्रकार रविवारी मुसळधार पावसात घडला.

 कोने येथील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी मुसळधार पावसात दरड कोसळण्याचा प्रकार घडला. संपूर्ण रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच  वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जात वाहतूक फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय जवळून वळविली. त्यामुळे वाहतुकीवर अधिक परिणाम दिसून आला नाही. त्यानंतर अग्निशमन दल, म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत तसेच बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला केली. अंदाजे तीन तासानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आली. 

म्हाळशी - कुर्टी येथील बगल रस्त्यावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. वाहतूक पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. मात्र मुसळधार पावसात आणखीन दरड कोसळण्याच्या धोका आहेच. केरये- खांडेपार येथील चर्च समोरील रस्त्यावर गटार तुंबल्याने सर्वत्र रस्त्यावर पाणी भरले. त्यामुळे फोंडा येथून खांडेपारच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

म्हार्दोळ येथील पंचायत कार्यालय पासून काही अंतरावर असलेल्या गुरूदास म्हार्दोळकर व श्यामकांत आकारकर यांच्या घरात पाणी पावसाचे पाणी शिरले. सकाळी घरात घुसलेले पाणी दुपार पर्यंत गटार साफ करे पर्यंत राहिल्याने दोन्ही घर मालकांना लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुपारी जेसीबीच्या सहाय्याने गटार साफ करण्यात आले. तसेच नागझर- कुर्टी येथील  नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने महादेव मंदिरात पाणी घुसले. 


हेही वाचा