पूजा शर्माच मुख्य सूत्रधार : पोलिसांचा कोर्टात दावा

अटकपूर्व जामिनाला एसआयटीचा विरोध : कोठडीची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 09:27 am
पूजा शर्माच मुख्य सूत्रधार : पोलिसांचा कोर्टात दावा

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या मालमत्तेवर पूजा शर्मा यांनी विक्री कराराद्वारे मालक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आगरवाडेकर कुटुंबाला बळजबरीने घरातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि भाड्याच्या गुंडांना घेऊन घराचा भाग पाडण्यात आला. या घटनेमागील मुख्य सूत्रधार पूजा शर्माच आहेत, असा दावा गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला आहे. या संदर्भात पूजा शर्मा यांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाला एसआयटीने विरोध करून त्यांची कोठडी आवश्यक असल्याचा दावा केला आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीय राहत असलेल्या घराचा भाग २२ जून रोजी दुपारी पाडण्यात आला होता. आगरवाडेकर पिता-पुत्राच्या अपहरण प्रकरणात हणजूण पोलिसांनी ३६५, ४२७ व ३४ कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा शाखेने भा.दं.सं.च्या ४४०, ४४७, ४४८, ३५२, ३५४, १४३, १४७, १४८ व १४९ ही कलमे जोडली आहेत. या प्रकरणात हणजूण पोलिसांनी जेसीबी चालक प्रदीप राणा व रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा यांना, तर गुन्हा शाखेने एका चालकासह पाच बाउन्सरना अटक केली होती. गुन्हा शाखेने शर्मा यांना २८ जून रोजी नोटीस बजावून १ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते.

गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत पुढील बाबी स्पष्ट झाल्या. पूजा शर्मा यांनी रिअल इस्टेट एजंट अर्शद ख्वाजा आणि इतर सराईत गुंडांच्या मदतीने आगरवाडेकर कुटुंबीयांचा घराचा भाग पाडला. यासाठी शर्मा आणि इतरांशी संभाषण करण्यासाठी ख्वाजाने वेगळा मोबाईल क्रमांक वापरला होता. हा मोबाईल तपासासाठी आवश्यक आहे. तपास निर्णायक टप्प्यात असून इतर फरार आरोपींना अटक होणे बाकी आहे. संशयितांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन वरील गुन्हेगारी कट रचला. त्यामुळे त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करणे आवश्यक आहे. बाऊन्सर्सना व इतरांना दिलेल्या पैशाचा स्रोत तपासणे आवश्यक आहे. ही कारणे देऊन गुन्हा शाखेच्या एसआयटीने पूजा शर्मा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार, ५ रोजी होणार आहे.

मालमत्ता खरेदी केल्याचा पूजा शर्मा यांचा दावा

याच दरम्यान पूजा शर्मा यांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यात त्या म्हणतात, वरील मालमत्ता क्रिस पिंटो यांच्याकडून ५ ऑगस्ट २०२३ रोजी खरेदी केली होती. या संदर्भात ८ सप्टेंबर २०२३ रोजी निबंधकांकडे प्रक्रिया केली आहे.

हेही वाचा