विमानसेवा कमी झाल्यास दाबोळी विमानतळ बनेल घोस्ट एअरपोर्ट : युरी आलेमाव

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
07th July, 04:02 pm
विमानसेवा कमी झाल्यास दाबोळी विमानतळ बनेल घोस्ट एअरपोर्ट : युरी आलेमाव

मडगाव :  एरोफ्लोटने दाबोळी विमानतळावरुन आपल्या सर्व विमानसेवा मोपा येथे हलवण्याची घोषणा केली. यातून दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल व दाबोळी विमानतळ लवकरच घोस्ट एअरपोर्ट बनेल. राज्य सरकारने यावर काहीतरी कृती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

एरोफ्लोट एअरलाइन्सने आपली विमानसेवा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्याची घोषणा केली. यावर विरोधी पक्षनेत्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बंद पाडून खासगी व्यावसायिकांना प्रोत्साहन देत असल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब दक्षिण गोव्यातील सर्व निवडून आलेले आमदार आणि खासदार तसेच सर्व संबंधित प्राधिकरणे आणि भागधारकांची बैठक बोलावावी आणि नंतर दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू राहावे यासाठी एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे घेऊन जावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे. 

 सरकारने दाबोळी विमानतळ कार्यान्वित ठेवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर हे विमानतळ घोस्ट एअरपोर्ट होईल असा इशारा २०२२ मध्येच दिला होता. दुर्दैवाने, सरकारने त्यानंतर काहीही केले नाही. एकामागून एक एअरलाइन्स आपल्या विमानसेवा मोपाला जात असताना सरकारने बघ्याची भूमिका घेतलेली आहे. कतार एअरवेजने मोपा येथे विमानसेवा हलवण्याची घोषणा केल्यानंतर दाबोळी  विमानतळावरुन सर्व विमानसेवा हळुहळू मोपाला जातील असे सांगितले होते. हा दावा आता खरा ठरत असल्याचे युरी आलेमाव म्हणाले. दक्षिण गोव्यात भाजपला राजकीय जनाधार मिळालेला नाही. त्यामुळे दाबोळी विमानतळाच्या होणार्‍या नुकसानीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

हेही वाचा