बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; स्थानिकांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th July, 02:06 pm
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; स्थानिकांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

जोयडा : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गांवरील  रामनगर जवळच्या अस्तोली ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यात मोरया मित्र मंडळ आणि मनिकंठ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावून प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. आतातरी सरकारने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

गेली आठ वर्षे या महामार्गाचे काम सुरु असून रामनगर ते अनमोडपर्यंत रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी जागोजागी डांबरीकरण केले होते. पण पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर गायब झाले असून जागोजागी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात दुचाकी, मोठी वाहने अडकून पडत आहेत. अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साफ दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला कोणी वाली नाही, त्यामुळे या रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. 

केंद्र सरकारने लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आतातरी रस्ता पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावी, अशी मागणी यावेळी मोरया मित्र मंडळाने केली. यावेळी महेश नाईक, परशुराम देसाई, मयूर गांधले, ज्ञानेश्वर देसाई, ओंकार गावडे, सुशांत हरिजन, प्रवासी उपस्थित होते.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या हे गेल्या आठवड्यात दिल्लीच्या दौऱ्यावर असताना राज्याच्या विविध समस्या, योजना घेऊन विविध खात्याच्या मंत्र्यांना भेटले . त्यामुळे या महामार्गाचे दुखणे ते केंद्र सरकारकडे मांडातील अशी अपेक्षा होती. त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट  घेतली. त्यात राज्यातल्या अनेक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयी त्यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली. परंतु गोवा आणि कर्नाटक राज्यासाठी आर्थिक कोरिडोर असलेल्या बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्ग ७४८ विषयी चर्चाही केली नाही. त्यामुळे त्यांना हा महामार्ग महत्वाचा वाटत नाही का, असा प्रश्न आता जोयडा व खानापूर तालुक्यातील नागरिक करीत आहेत. खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हेही नितीन गडकरी यांना भेटून आले आहेत, पण त्यांनीही या रस्त्याचे दुखणे त्यांना न सांगितल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

या महामार्गाचे काम बेळगाव ते खानापूर पर्यंत जवळपास पूर्ण झाले आहे. खानापूर - रामनगर ते अनमोड पर्यंत हे काम कासवगतीने सुरु आहे.  या महामार्गांवर चार ठिकाणी उड्डाणं पूल होणार होणे आवश्यक आहे, त्यासाठी रस्ते खणून ठेवले आहेत, जिथे लहान लहान पुले बांधन्यात येणार आहेत त्या ठिकाणी  काँक्रिटीकरण केले नसल्यामुळे पावसात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातूनच अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.

बेळगाव, हुबळीला गोव्याशी जोडणारा मार्ग..

बेळगाव, धारवाड, हुबळी, तेलंगणा, आंध्र प्रदेशला गोव्याशी जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. बेळगाव, धारवाड, हुबळी, जोयडा, खानापूर भागातील अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह या मार्गमुळे होत असून आर्थिक कॉरिडोर म्हणून या मार्गाची ओळख आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या मार्गाची समस्या सोडविण्यासाठी गडकरी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. पण तसे न झाल्याने या महामार्गाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री.. तरीही..

केनरा लोकसभा मतदारसंघांचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना प्रचारावेळी खानापूर आणि जोयडा तालुक्यातील जनतेने या रस्त्याविषयी  त्यांच्या कानावर घातले होते. आता कागेरी या भागाचे खासदार आहेत. बेळगाव, हुबळी धारवाडसाठिही हा रस्ता महत्वाचा आहे, त्यामुळे हुबळीचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री व बेळगाव चे खासदार जगदीश शेट्टर हे केंद्रीय सरकारमध्ये आहेत. मात्र त्यांनीही या रस्त्याबाबत बघ्याची भूमिका घेतली आहे.

ज्या तत्परतेने या महामार्गांवर टोलनाका सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस बैठका घेऊन टोल सुरू केला. त्याप्रमाणे खानापूर ते अनमोड रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवलेली नाही.  खानापूर ते अनमोड रस्त्यापर्यंतच्या दर्जाबाबत प्रवासी व नागरिकांतून असमाधान व्यक्त होत आहे. 

डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार का?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदाराला डिसेंबर २०२४ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याची नोटीस दिली आहे. मात्र कामाची गती व पाऊस पाहता डिसेंबर पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा