कोलवाळमध्ये वीज समस्या गंभीर

लपंडावामुळे विजेची उपकरणे नादुरुस्त होत असल्याने संताप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th July, 12:07 am
कोलवाळमध्ये वीज समस्या गंभीर

म्हापसा : कोलवाळ गावात मान्सूनला प्रारंभ झाल्यापासून वीज समस्या निर्माण झाली आहे. विजेचा लपंडाव, त्यातच वीज उपकरणे नादुरुस्त होत असल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. गावातील कनिष्ठ अभियंता कार्यालयात अभियंता गैरहजर असतो. त्यामुळे वादळी वारा, पाऊस नसताना वीज पुरवठा गुल होण्यामागचे कारण समजणेही कठीण बनले आहे.
जून महिना सुरू झाल्यापासून गावात वीज पुरवठ्याची समस्या सुरू झाली आहे. दर दिवशी वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मंगळवार दि. २ व दि. ३ जुलै या दिवशी तर विजेच्या लपंडावात कमालीची वाढ झाली. दर मिनिटाला हा प्रकार सुरू होता. यामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
गेल्या वर्षी असाच विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे अनेकांची वीज उपकरणे खराब झाली होती. यंदाही तीच परिस्थिती असल्याने लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: गृहनिर्माण वसाहत, कोणीवाडा, रामनगर, नाका या भागात विजेची नेहमीच समस्या असते.

दरवर्षी कोलवाळमध्येच ही समस्या उद्भवते. तरीही वीज खाते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावर तोडगा काढण्यास पुढाकार घेत नाहीत. वीज पुरवठा तासनतास गायब असल्यामुळे कोलवाळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेवर परिणाम होतो. फ्रिजमध्ये ठेवली जाणारी इंजेक्शने खराब होतात. या लपंडावामागील नेमके कारण रहिवाशांना समजणे गरजेचे आहे.
- रितेश वारखंडकर, पंच

गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. कार्यालयात कनिष्ठ अभियंता अनुपलब्ध असतो. त्यामुळे या समस्येचे नेमके कारण समजत नाही. तसेच सरकारने अद्याप भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पाला चालना दिलेली नाही. हा गाव एकप्रकारे वीज खात्याने वाळीत टाकला आहे.
- नित्यानंद कांदोळकर, माजी सरपंच


गावात वीज पुरवठ्याची मोठी समस्या आहे. विशेषत: प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील काही वाड्यांवर ही समस्या नित्याचीच बनली आहे. वीज पुन्हा पुन्हा खंडित होत असल्याने लोकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. सरकारने विशेषकरून वीज खात्याने या समस्यावर तत्काळ तोडगा काढावा.
- दशरथ बिचोलकर, सरपंच

हेही वाचा