हॉकी इंडिया लीगला मिळणार नवसंजीवनी

७ वर्षांपूर्वी बंद झालेल्या हॉकी लीगचे यावर्षी पुनरागमन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
03rd July, 11:35 pm
हॉकी इंडिया लीगला मिळणार नवसंजीवनी

नवी दिल्ली : आयपीएलच्या धर्तीवर भारतीय हॉकीचा स्तर सुधारण्यासाठी आणि त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी हॉकी इंडियाने ११ वर्षांपूर्वी हॉकी इंडिया लीग सुरू केली होती. पण, आर्थिक कारणास्तव ७ वर्षांपूर्वी बंद झालेली हॉकी लीग यावर्षी पुनरागमन करत आहे. यावेळी खेळाडूंवर पूर्वीपेक्षा जास्त पैशांचा वर्षाव केला जाईल.

भारतीय राष्ट्रीय संघ आणि देशांतर्गत खेळाडूंव्यतिरिक्त जगभरातील अनेक बड्या खेळाडूंना यात भाग घेता येणार आहे. सात वर्षांपूर्वी या लीगला खूप पसंती मिळाली होती. भविष्यात भारतीय हॉकीलाही त्याचा फायदा झाला होता. भारताने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान स्पर्धेसाठी खिडकी निश्चित केली आहे. या वेळीही पुरुष लीगसोबतच महिला लीग सुरू राहणार आहे. यावेळी फ्रँचायझीला खेळाडूंवर खर्च करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. देशातील ३० मोठ्या कॉर्पोरेट्सनी या स्पर्धेत फ्रँचायझी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


हॉकी इंडिया पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेनंतर खेळाडूंची नोंदणी सुरू करणार आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार देशांतर्गत आणि ५०० ​​हून अधिक परदेशी खेळाडूंनी यात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलच्या धरतीवर या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 

लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संंधी नाही

आयपीएलप्रमाणे या लीगमध्येही पाकिस्तानी खेळाडू दिसणार नाहीत. लीगच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळाली होती. पण, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर या खेळाडूंना मध्येच सोडून जावे लागले होते.