मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग शुल्कात वाढ, टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

पार्किंग शुल्कात तब्बल एकशे वीस रुपयांची वाढ; या प्रश्नी तोडगा काढू, आर्लेकरांचे आश्वासन

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd July, 04:20 pm
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग शुल्कात वाढ, टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

पेडणे: तालुक्यातील मोपा मनोहर इंटरनॅशनल विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्या जटील बनवण्यात सरकार आणि कंपनी यशस्वी ठरत असल्याचे चित्र सध्या तयार होऊ लागलं आहे. मोपा विमानतळावरील पार्किंग शुल्कात तब्बल 120 रुपयांनी वाढ केल्याने मंगळवारी टॅक्सी चालकांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्र घेतला. मात्र गेटपाशी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा असल्याने टॅक्सी चालकांना आंदोलन करणे शक्य झाले नाही. 

दरवाढी विरोधात टॅक्सी व्यावसायिकांनी मोपा इंटरनॅशनल विमानतळाच्या मुख्य गेटवर आंदोलन करण्याचा इशारा दिला. एकंदरीत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य गेटवर मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा उपस्थित केला होता.  मोपा विमानतळावर जीएमआर कंपनी टॅक्सी चालकांसाठी पूर्वी 80 रुपये पार्किंग शुल्क आकारात होती. त्यात तब्बल 120 रुपयांनी वाढ केल्याने सद्यस्थितीत २०० रुपये पार्किंग शुल्क द्यावे लागत आहे. 

आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आश्वासन

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी टॅक्सी व्यावसायिकांची भेट घेत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यामार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत हा विषय सुटत नाही तोपर्यंत कंपनीने टॅक्सी पार्क शुल्क वाढ करू नये. जेवढे पैसे पूर्वी (80 रुपये) आकारात होते, तेवढेच ठेवावे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे योग्य तो तोडगा काढतील असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थितांना सांगितले.