डीजीपी जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी बदली

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार महासंचालक दिल्लीला


04th July, 12:01 am
डीजीपी जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी बदली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हणजूणचे निलंबित पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांना सादर केलेल्या अहवालामुळे आसगाव प्रकरणात अडकलेल्या पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांची कोणत्याही क्षणी​ बदली होऊ शकते. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार जसपाल सिंग बुधवारी एक दिवसाची सुट्टी घेऊन दिल्लीलाही जाऊन आले.
आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे राहते घर जेसीबीने पाडण्यासह आगरवाडेकर पिता-पुत्राच्या अपहरण प्रकरणाने अनेक वळणे घेतल्यानंतर सरकारने हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांना निलंबित केले होते. या निलंबनानंतर प्रशल नाईक देसाई यांनी मुख्य सचिवांना अहवाल सादर करत जसपाल सिंग यांच्या सांगण्यावरूनच प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यात आले. घर न पाडल्यास कारवाईची तसेच ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी सिंग यांनी आपल्याला दिल्याचा दावाही त्यांनी अहवालात केला होता. हा अहवाल सरकारने गृह मंत्रालयास पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही गेले दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून असतानाच जसपाल सिंगही बुधवारी सुट्टी घेऊन दिल्लीला गेले. गृह मंत्रालयानेच सिंग यांना दिल्लीला पाचारण केले होते. त्यामुळे त्यांची कोणत्याही क्षणी बदली होऊ शकते, अशी मा​हिती सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
वैयक्तिक कारणास्तव दिल्लीला आलो !
डीजीपी जसपाल सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, वैयक्तिक कारणामुळे आपण सुट्टी घेऊन दिल्लीला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशल नाईक देसाई यांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालाबाबत विचारले असता, मुख्य सचिव चौकशी करून योग्य तो निष्कर्ष काढतील, असेही त्यांनी नमूद केले.              

हेही वाचा