मूळ गोमंतकीयांनी दाखवली यूकेत ताकद !

लेबर पार्टीच्या यशात भूमिका : ‘ख्रिस्तालीन’चीही चालली जादू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 12:09 am
मूळ गोमंतकीयांनी दाखवली यूकेत ताकद !

पणजी : युनायटेड किंगडमच्या (यूके) निवडणुकीत लेबर पार्टीने एतिहासिक विजय मिळवला. तब्बल १४ वर्षांनंतर लेबर पार्टीचे सरकार आले. ६५० सदस्य असणाऱ्या युकेच्या संसदेत लेबर पार्टीने ४१२ जागा मिळवल्या. प्रथमच मूळच्या भारतीय वंशाचे २६ जण खासदार म्हणून निवडून आले. यामध्ये तीन मूळ गोमंतकीय वंशाच्या तिघा महिलांचा समावेश आहे. या निवडणुकीत बहुतेक गोमंतकीय वंशाच्या लोकांनी लेबर पार्टीला पाठिंबा दिला होता.      

क्रिशेना डायस या डिजिटल मीडिया कंटेंट क्रिएटर आहेत. त्यांनी फेल्थहॅम आणि हेस्टन येथील लेबर पार्टीच्या उमेदवार सीमा मल्होत्रा यांच्यासाठी निवडणूक काळात विविध प्रकारचे व्हिडीओ तयार केले. डायस यांनी आपल्या इन्स्टाग्राम, फेसबुकवरून हे व्हिडीओ प्रसारित केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. डायस या कोकणी बोलणाऱ्या जेष्ठ महिला ‘ख्रिस्तालीन’चे पात्र प्रभावीपणे सादर करतात. 

    

अशाच एका इन्स्टाग्राम रीलमध्ये ‘ख्रिस्तालीन’ लेबर पार्टीचे निवडणूक जाहीरनाम्यातील गोष्टी समजावून घेताना दिसतात. यामध्ये लेबर पार्टी शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कोणत्या गोष्टी करणार हे मजेशीर पद्धतीने सांगण्यात आले आहे. विशेष ढंगाची कोकणी भाषा, व्हिडीओमध्ये येणारे गोव्यातील संदर्भ, पारंपरिक मध्यमवयीन गोमंतकीय महिलेचे चित्रण यामुळे यूकेत स्थायिक झालेल्या मूळच्या गोमंतकीयांत ख्रिस्तालीन आणि पर्यायाने डायस लोकप्रिय आहेत. या लोकप्रियतेचा फायदा सीमा मल्होत्रा यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेसाठी करून घेण्यात आला. आणि मल्होत्रा जिंकल्याने प्रचार मोहिमेत यश देखील आले.      

हेही वाचा