लोटलीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा नाेंद

वैद्यकीय अहवालानुसार कारवाईचे डीजीपींचे आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th July, 12:02 am
लोटलीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा नाेंद

मडगाव : लोटलीतील कन्हैयाकुमार मंडल (३२) याच्या मृत्यूप्रकरणी ‘हिट अँड रन’ प्रकरण नोंदवण्यात आले होते. पोलीस महासंचालकांकडून वैद्यकीय अहवालानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शनिवारी या प्रकरणी खुनाचे कलम नोंद करण्यात आले आहे.

लोटलीतील वेर्णा मिसिंग लिंकवर अज्ञाताचा मृतदेह मिळाला व त्यावेळी ‘हिट अँड रन’ प्रकरण नोंद केले. पण आता याप्रकरणी वैद्यकीय अहवालानुसार खुनाचे कलम नोंद करण्यात आले आहे. २५ जून रोजी रात्री मृतदेह आढळल्यानंतर मायना कुडतरी पोलिसांनी ‘हिट अँड रन’ प्रकरण नोंद केले होते.

मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असता नातेवाईकांनी फोंडा येथे गोंधळ घालणाऱ्या कन्हैयाकुमारला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले व दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळल्याचे सांगितले. फोंडा पोलिसांच्या ताब्यातील व्यक्ती लोटलीत कशी आली, याचा शोध घेतला असता फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट वाहनाने त्याला आणून सोडल्याची माहिती फोंडा पोलिसांनी समजली. 

यानुसार मायना कुडतरी पोलिसांकडून हवालदाराचा जबाब नोंदवण्यात आला. वैद्यकीय अहवालातही गळा, हातासह पोटावर वार केल्याचे तसेच वाहन अंगावरुन जाण्यापूर्वीच कन्हैयाकुमारचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील खुनाचा संशय बळावलेला. 


दरम्यान, सेवेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट वाहनावरील हवालदार रवींद्र नाईक, कॉन्स्टेबल अश्विन सावंत व वाहन चालक प्रीतेश प्रभू यांचे निलंबन करण्यात आले. मृतदेहावरुन गेलेल्या लॉरीला धारवाड कर्नाटकातून ताब्यात घेतले त्यानंतर वाहनचालकालाही ताब्यात घेतले होते. 

खूनप्रकरणातील अज्ञातांना शोधण्याचे आव्हान

आता या प्रकरणी खुनाचा गुन्हा अज्ञाताविरोधात नोंद झाला आहे. पोलिसांनी कन्हैयाची सुटका केल्याची नोंद न केल्याने तो पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा प्रकार झाल्याची शंका उपस्थित होत आहे. आता कोणत्या अज्ञाताने कन्हैयाकुमारवर वार करत त्याचा खून केला व अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला हे शोधणे आव्हानात्मक आहे.

पोलीस महासंचालकांनी मडगाव पोलीस मुख्यालयाला भेट दिली व वैद्यकीय अहवालानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल, असे स्पष्ट केलेले होते. आता पोलिसांकडून खुनाचे कलम नोंद केलेले आहे. खुनाचे प्रकरण म्हणून नोंद करताना अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा