माळोली, साट्रे, कोदाळ, देरोडेत वीज गुल

वीज वाहिन्यांवर झाड पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 12:35 am
माळोली, साट्रे, कोदाळ, देरोडेत वीज गुल

वाळपई : वादळी वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांवर झाड पडून माळोली, कोदाळ, साटरे, देरोडे या भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या कार्यालयाला माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन केबलवर पडलेले झाड दूर केले. या झाडामुळे गावात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता.

अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर झाड दूर करत रस्ता मोकळा केला मात्र केबल जळाल्यामुळे या भागातील वीजपुरवठा मात्र खंडित झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून सत्तरी तालुक्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून नव्याने घातलेल्या केबल देखील सातत्याने नादुरुस्त बनत आहेत. सरकार पातळीवरूनही याकडे विशेष लक्ष देण्यात येत नसल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

केबल सातत्याने नादुरुस्त, तक्रारीकडे काणाडोळा!
काही वर्षांपूर्वी माळोली, देरोडे, कोदाळ, साटरे या भागांमध्ये केबल घालून वीजपुरवठा करण्यात आला होता. मात्र या केबल सातत्याने नादुरुस्त बनत असल्याने वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात.

कित्येकदा वाळपई वीज खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन या संदर्भात तक्रारी केल्या गेल्या. मात्र या तक्रारींची दखल अजून पर्यंत घेण्यात आली नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे रहिवाश्यांनी सांगितले.      

हेही वाचा