बांबर-सत्तरी येथील विहीर कोसळली

पाणी टंचाईची शक्यता : तत्काळ उपाययोजना करण्याची​ मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th July, 11:34 pm
बांबर-सत्तरी येथील विहीर कोसळली

बांबर-सत्तरी येथील कोसळलेली विहीर.   

वाळपई : बांबर या ठिकाणी असलेली पिण्याच्या पाण्याची विहिरी शनिवारी अचानकपणे कोसळली. यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे . पावसामुळे ही विहीर कोसळल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र विहीर कोसळल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्षपणे भेट देऊन पाहणी केली. या संदर्भाचा अहवाल सरकारला सादर करण्यात येईल. त्याचबरोबर तत्काळ या विहिरीची दुरुस्ती करणे शक्य आहे की नाही, या संदर्भाची तपासणी करून पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बांबर येथील सरकारी प्राथमिक शाळेसमोर असलेली विहीर शनिवारी सकाळी अचानकपणे कोसळली. दरम्यान या संदर्भात सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या तरी विहिरीला कुंपण घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या गावातील ग्रामस्थांना सध्या तरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून पर्यायी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहेत.
पंच सभासद चंद्रकांत मानकर यांनी सांगितले की सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याचे अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययाेजना करावी. कारण या गावातील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याच्या अभावी हाल होणार आहेत. येणाऱ्या काळात या विहिरीच्या भोवती कठडा उभारण्यात यावा, अशी मागणी मानकर यांनी केलेली आहे.

हेही वाचा