झणझणीत मालवणी चिकन

Story: उदरभरण |
07th July 2024, 05:03 am
झणझणीत मालवणी चिकन

मॅरिनेट करण्यासाठी साहित्य -

मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे, अर्धा इंच आले, १२ लसूण पाकळ्या, ओली कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला.

चिकन बनवण्यासाठी साहित्य -

१ मोठा कांदा उभा चिरून,अर्धी वाटी सुके खोबरं, २ टीस्पून धने, १/४ टीस्पून शहाजिरे, ८-१० मिरी, ४ लवंग, १ वेलची, दोन मोठे दालचिनीचे तुकडे, १ कांदा बारीक चिरून, ४ टोमॅटो बारीक चिरून किंवा प्युरी करून, २ टीस्पून लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

कृती-

आले, लसूण, कोथिंबीर बारीक वाटून चिकनला लावून घ्यावी. त्यात हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीजमध्ये ४-५ तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या.

एका पातेल्यात थोडे तेल घालून उभा चिरलेला कांदा, धणे, शहाजिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची घालून परतावे. कांदा सोनेरी रंगाचा होत आला की सुके खोबरे घालून खरपूस भाजून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यावे.

नंतर पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊन त्यात दोन टीस्पून लाल तिखट घालून चांगले परतून घ्या. मॅरिनेट केलेले चिकन घालून परता. त्यात थोडे पाणी घालून चिकन चांगले शिजल्यावर वाटलेला टोमॅटो घाला. वाटण घालून सगळं नीट परतून घ्या. चव घेऊन पहा. गरज असल्यास थोडे मीठ घाला. बारीक चिरलेली ओली कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्या.


कविता आमोणकर