तिसऱ्यांचे सुके

Story: उदरभरण |
21st July, 05:55 am
तिसऱ्यांचे सुके

पावसाळ्यात ताजे मासे मिळत नाहीत. तिसऱ्या मात्र मिळतात. या तिसऱ्यांची झटपट पण चविष्ट अशी ही कृती नक्की करून पहा.

साहित्य : तिसऱ्यांचा एक वाटा, दोन हिरव्या मिरच्या, दोन मोठे कांदे, अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा गरम मसाला, अर्धा खोवलेला ओल्या नारळाचा कीस, ४/५ कोकम, अर्धा चमचा साखर, मूठभर हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली.

कृती : प्रथम तिसऱ्या चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्याची एक शिपी करून घ्यावी. एका पातेल्यात कांदा, हिरव्या मिरच्या (उभ्या चिरून), हळद पावडर, गरम मसाला, ओल्या नारळाचा कीस, मूठभर चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर हे सर्व जिन्नस घालून एकत्र करावे. त्यात साफ केलेल्या तिसऱ्या घालाव्यात. नंतर पाव कप पाणी घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजायला ठेवावे. तिसऱ्या शिजत आल्यावर छान वास सुटला की थोडी चिरलेली कोथींबीर घालून सजवावे. गरमागरम चपाती किंवा पावासोबत खायला मस्त लागते हे तिसऱ्यांचे सुके.