सुंगटाचे लोणचे

Story: उदरभरण |
23rd June, 12:23 am
सुंगटाचे लोणचे

सुंगटाचे लोणचे हे प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात रुचिने खाल्ले जाते. पावसाळा सुरू झाला की सुरुवातीच्या काळात मासेमारीवर निर्बंध लागतात. बाजारातही ताजे मासे मिळत नाहीत. अशा वेळेस सुंगटाचे चटपटीत लोणचे चवीला सोबत असल्यास जेवणात मजा येते.

साहित्य :  

१) साफ केलेली सुंगटं एक मोठी वाटी, आले लसूण पेस्ट १ छोटा चमचा, लाल तिखट १ छोटा चमचा, अर्धा चमचा हळद पावडर, थोडे तेल (गोडेतेल किंवा मोहरीचे असल्यास), चवीनुसार मीठ.  

२) फोडणीसाठी - तेल, मोहरी, मेथी दाणे, ताजा कडीपत्ता, १ लहान चमचा काळीमिरी पावडर, १ लहान चमचा लाल तिखट, लहान चमचा हळद, दोन लिंबाचा रस.

कृती :

सुंगटं स्वच्छ धुवून घ्यावी आणि साहित्य क्रमानं १ मध्ये दिले आहे ते सर्व त्यात घालावे व चांगले कालवून घ्यावे. एका छोट्या कढईत चार/पाच चमचे तेल गरम करून घ्यावे व सुंगटा तळून घ्यावीत. त्याच तेलात साहित्य क्रमांक २ मध्ये दिलेले साहित्य घालून त्यात तळलेली सुंगटं घालून मिश्रण एकजीव करा आणि लिंबाचा रस घाला. एक वाफ आणू द्यावी व गॅस बंद करावा. तयार आहे मस्त असे चटपटीत सुंगटाचे लोणचे.


कविता आमोणकर