कुरकुरीत चिकन स्ट्रिप्स

Story: उदरभरण |
14th July, 05:38 am
कुरकुरीत चिकन स्ट्रिप्स

वसाळ्यात जेवणाच्या आधी किंवा जेवणासोबत कुरकुरीत चटकदार असे काहीतरी हवे असते. आजची रेसिपी कुरकुरीत चिकन तंदुरी स्ट्रिप्स ही अशीच भन्नाट रेसिपी आहे. चला, करूया तर !

साहित्य 

१) चिकन मुरवण्यासाठी  साहित्य -  अर्धा किलो चिकन ब्रेस्ट, २ मोठे चमचे दही, २ चमचे आले लसूण पेस्ट, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, प्रत्येकी अर्धा चमचा धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, चिमूटभर हळद, १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबूचा रस, हवा असल्यास चिमूटभर खायचा लाल रंग.

२) कोटींगसाठी- एक अंडे, थोडासा रेड चिली सॉस, अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट, मीठ.

३) कोटींगसाठी – अर्धा कप मैदा, प्रत्येकी अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट, चाट मसाला, काळीमिरची पावडर, चवीपुरते मीठ, थोडे कच्चे कॉर्नफ्लेक्स चुरा करून,  तळण्यासाठी तेल.

कृती 

प्रथम चिकन ब्रेस्ट धुवून त्याचे लांबट तुकडे करून घ्यावे.  नंबर एकमध्ये दिलेले सर्व साहित्य एकत्र करुन त्यात हे तुकडे किमान अर्धा तास मुरवत ठेवावे. नंबर दोनमध्ये दिलेले साहित्य एकत्रित करून घ्यावे. तिसर्‍या क्रमांकाचे साहित्यही एकत्रित करून घ्यावे.

तंदुरी चिकन स्ट्रिप्स तयार करण्यासाठी मुरवत ठेवलेल्या स्ट्रिप्स एकेक घेऊन त्या प्रथम दोन क्रमांकाच्या मिश्रणात बुडवून घ्याव्यात. त्यानंतर साहित्य क्रमांक तीन मधील मिश्रणात घोळवून घ्याव्यात आणि चुरा केलेल्या कॉर्नफ्लेक्समध्ये टाकून त्यावर सर्व बाजूने कॉर्नफ्लेक्स लावून घ्यावे. कढईत तेल गरम करून या सर्व स्ट्रिप्स सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात. तयार आहे कुरकुरीत चिकन स्ट्रिप्स. मेयोनीज किंवा शेजवान सॉस सोबत छान लागतात.


कविता आमोणकर