क्रिस्पी ज्युसी मलाई चिकन कबाब फ्राय

Story: उदरभरण |
09th June, 05:32 am
क्रिस्पी ज्युसी मलाई चिकन कबाब फ्राय

चिकन कबाब हे जर ज्युसी, क्रिस्पी असतील तर खाताना आपली जिव्हा तृप्त तर होणारच! कारण हे ज्युसी चिकन कबाब खाताना त्याचा सुगंधही आपल्या मनाला तृप्त करत असतो. आजची ही रेसिपी अशीच आहे. अगदी झटपट होणारी. क्रिस्पी, ज्युसी मलाई चिकन कबाब फ्राय.

साहित्य - अर्धा किलो बोनलेस चिकन मध्यम आकाराचे तुकडे करून, ७/८ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, १ चमचा हिरवी मिरची बारीक चिरून, अर्धा चमचा चिली फ्लेक्स (चिली फ्लेक्स नसतील तर सुकी मिरची जाडसर बारीक करून घ्यावी), अर्धा चमचा सफेद मिरी पावडर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर, १ अंडे, १ चीज क्यूब, पाव चमचा हिरवी वेलची पावडर, ३ मोठे चमचे फ्रेश क्रीम, १ चमचा तांदूळ पीठ, १ चमचा कॉर्न फ्लोअर, चवीनुसार मीठ, थोडी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून.

कृती - बोनलेस चिकन चांगले धुऊन घेऊन त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. वरील सर्व मिश्रण या बोनलेस चिकनमध्ये घालून मिश्रण चांगले कालवून घ्यावे आणि मुरवण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून एकेक चिकनचे तुकडे सोनेरी रंगावर अलगद फ्राय करून घ्यावे. करपवू नयेत. सोनेरी रंग आल्यावर लगेच काढून घ्यावेत. हिरव्या चटणीसोबत फारच छान लागतात. नक्की करून पहा.


कविता आमोणकर