फणसाचे होले

Story: उदरभरण |
02nd June, 05:31 am
फणसाचे होले

रसाळ फणसाच्या गर्‍यापासून, फणसाच्या पानात बनवलेला हा पदार्थ फार रुचकर लागतो. उकडून केल्यामुळे यात तेलाचे प्रमाण नाही. त्यामुळे कितीही खाल्ल्यास काहीही अपाय होण्याची भीती नसते. चला तर मग, आज करूया फणसाचे होले!

साहित्य : - 

फणसाची पाने, गावठी तांदूळ, फणसाचे गरे, गूळ, खोवलेले ओले खोबरे, वेलचीपूड.

कृती : -

गावठी तांदूळ आदल्या रात्री भिजत घालावे. दुसर्‍या दिवशी पाणी काढून जाडसर वाटून घ्यावे. फणसाची पाने धुवून मधोमध वळवून कोनासारखा आकार करून घ्यावा आणि त्याला काडीने टोचून घ्यावे. म्हणजे हा कोन उघडणार नाही. फणसाच्या गर्‍यांचे तुकडे करून घ्यावेत.

एका पातेल्यात थोडे तूप घालून त्यावर फणसाच्या गर्‍यांचे तुकडे तळसून घ्यावेत. त्यात किसलेला गूळ चवीनुसार घालून ढवळावे व एक वाफ आणावी. त्यात दोन चमचे पाणी घालून खोवलेले ओले खोबरे घालावे. वेलची पावडर घालावी. हे मिश्रण मंद आचेवर ढवळत सुकवून घ्यावे.

फणसाच्या पानाचे जे कोन करून घेतले होते, त्यात वाटलेल्या तांदळाचे जाडसर मिश्रण आत लावून घ्यावे. त्यात फणस व खोबर्‍याचे मिश्रण भरून वरुन परत तांदळाचे जाडसर मिश्रण लावून बंद करावे. अशा तर्‍हेने सर्व कोन  तयार करून घ्यावेत. एका मोठया पातेल्यात पाणी भरून त्यावर ताटली ठेवून किंवा मोदक पात्रात हे सर्व कोन दहा मिनिटे उकडून घ्यावेत आणि गरमागरम खायला घ्यावे.


कविता आमोणकर