‘हिट अँड रन’ प्रकरणातील मृत व्यक्तीच्या गळा, पाेटावर वार झाल्याचा अहवाल

लोटलीतील अपघात की घातपात ? : वाहन शोधासाठी पथक कर्नाटकात


04th July, 12:23 am
‘हिट अँड रन’ प्रकरणातील मृत व्यक्तीच्या गळा, पाेटावर वार झाल्याचा अहवाल

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

मडगाव : लोटली येथे २५ जून रोजी एका व्यक्तीला उडवून गाडीने पलायन केले होते. वैद्यकीय अहवालातील काही गोष्टी उघड झाल्यावर आता या घटनेने वेगळे वळण घेतले आहे. मृतदेह बिहारातील कन्हैया कुमार मंडल (३२) याचा असून शवचिकित्सेनंतर मृतदेहाच्या गळ्यावर, पोटात धारदार वस्तूने वार केल्याचे समोर आल्यानंतर हा घातपात असण्याची शक्यता वाढली आहे. वाहनाच्या शोधासाठी एक पथक कर्नाटकात गेले असल्याचे दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी स्पष्ट केले.                  

लोटली येथील वेर्णा औद्योगिक वसाहतीकडील रस्त्यावर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला व त्यावरून वाहन गेल्याचे दिसून आले होते. मायना कुडतरी पोलिसांनी ‘हिट अँड रन’ म्हणून नोंद केली. त्यानंतर ही व्यक्ती बिहार येथील कन्हैयाकुमार मंडल असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, कन्हैयाला आदल्या दिवशी गोंधळ घालत असल्याने फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे नातेवाईकांकडून समजले. त्यानुसार मायना कुडतरी पोलीस सदर व्यक्ती फोंडा येथून लोटलीला कशी पोहोचली, याचा तपासही करत आहेत. फोंडा येथील रोबोट पथकातील कॉन्स्टेबलकडून माहिती घेण्यात आली असून सदर व्यक्तीला लोटलीत आणून सोडल्याचा जबाब दिला आहे. असे असतानाही फोंडा पोलिसांकडून सदर व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दुसऱ्या दिवशी नोंद करण्यात आली. 

कन्हैयाकुमार याच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर शवचिकित्सा करण्यात आली. मृतदेहाच्या गळ्याच्या भागावर, हातावर व पोटावर वार केल्याचे समोर येत आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले.  मोठ्या वाहनांच्या खाली लावण्यात येत असलेल्या वस्तूंनीही जखमा होऊ शकतात. वाहनाच्या शोधासाठी पथक कर्नाटक राज्यात गेलेले आहे. वाहन मिळाल्यानंतरच तपासाला दिशा मिळेल, असे स्पष्ट केले.

आधी खून, नंतर भासवले ‘हिट अँड रन?’

फोंडा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला कन्हैयाकुमार मंडल याचा मृतदेह लोटलीत आढळणे, दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून बेपत्ता म्हणून नोंद करणे तर शवचिकित्सेआधी दिलेल्या जबाबात त्याला लोटलीत आणून सोडल्याचा जबाब देणे, चिकित्सेवेळी गळ्यावर, पोटावर धारदार वस्तूने वार केल्याप्रमाणे खुणा आढळणे यातून सदर व्यक्तीच्या घातपातानंतर ‘हिट अँड रन’ प्रकरणात ते बदलण्याचा प्रकार झाला असावा, असा संशय बळावत आहे.

हेही वाचा