मडगावात भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रकार

केतन कुडतरकर : नगरसेविका सुशांतासह केतनचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 12:30 am
मडगावात भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रकार

मडगाव : माजी नगरसेवक तथा भाजप मंडळाचे सरचिटणीस केतन कुडतरकर यांनी नगरसेवक सुशांता यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दुसऱ्या पक्षांतून आमदार भाजपमध्ये आल्यापासून मूळ कार्यकर्त्यांना प्रत्येक बाबतीत डावलण्यात येत असल्याचे सांगत हीच परिस्थिती राज्यभर आहे, पण कुणी बोलत नाहीत, असे केतन कुडतरकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषद घेत केतन कुडतरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्याग केल्याचे सांगितले. कुडतरकर यांनी सांगितले की, आपण किंवा आपल्या घरातील मंडळी ही भाजपचे पाठिराखे आहोत. अगदी पोस्टर चिकटवण्यापासूनची कामे केलेली आहेत, सारखेसारखे पक्षही बदललेले नाहीत. आमदार कामत हे भाजपमध्ये आल्यानंतर आपणासही चांगले वाटलेले होते. सरकार भाजपचे असले तरीही कुणाचीतरी कामे मागे राहत होती, ती पूर्ण होतील, असे वाटले होते. भाजपच्या धोरणानुसार कामे झाल्यास मडगावात बदल होईल, असे वाटत होते. पण आता भाजपचे मूळ कार्यकर्ते प्रत्येकठिकाणी डावलले जात आहेत व नव्या कार्यकर्त्यांची​ कामे होत आहेत. पण मूळ कार्यकर्त्यांना बाजूला करत त्यांची कामे रोखली जात असल्याचे दिसून आले. पक्ष सत्तेत असतानाही लोकांची कामे होत नाहीत, त्यासाठी येरझाऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे विरोधात राहण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांवर नव्याने पक्षात आलेल्या लोकांकडून अन्याय होण्याचा प्रकार मडगावसह ज्याठिकाणी आमदारांना प्रवेश दिला त्याठिकाणीही होत आहेत.
आमदारांच्या दबावाखाली राहून काम करू शकत नाही. सांडपाण्याचा प्रश्न, रिंगरोडवरील १५ कुटुंबांचा विषय आमदारांकडे मांडला. पण त्यांनी लक्ष दिला नाही. कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याने याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली होती. पण काही झालेले नाही. लोकांच्या सांगण्यानुसार भाजप सोडला व आता कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णयही लोकांशी चर्चा करुन घेण्यात येईल, असेही कुडतरकर यांनी सांगितले.                

हेही वाचा