‘चर्चेची वार्ता’: गोव्याच्या जमिनी रियल इस्टेट एजंटच्या घशात घालू नका !

‘चर्चेची वार्ता’ मध्ये अभिप्राय- भूमी पुत्राची जमीन भूमीपुत्रांना द्यावी.

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
04th July, 12:27 am
‘चर्चेची वार्ता’: गोव्याच्या जमिनी रियल  इस्टेट एजंटच्या घशात घालू नका !

पणजी : ‘आसगाव प्रकरणामुळे घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राहत्या जमिनींचे अधिकार मूळ गोमंतकीयांना देणे आवश्यक आहे. सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?’ असा प्रश्न दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'चर्चेची वार्ता' या सदरात विचारण्यात आला होता. यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. वाचक म्हणतात की, पोर्तुगीज कायदे बदलण्याची गरज निर्माण झाली असून सरकारने आसगावातील हे प्रकरण गंभीररित्या घेतले पाहिजे. यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

आता खरी गरज आहे ती म्हणजे म्हणजे पोर्तुगीज कारकिर्दीत असणारे कायदे बदलण्याची. हे सरकारचे काम आहे.अन्यथा खूप वाईट परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. - सुदन गाड

सरकारला आता तरी जाग आली पाहिजे. आसगावातील हे प्रकरण खरंच गंभीररित्या घेतलं पाहिजे. गोव्याच्या जनतेसाठी योग्य ती पावले उचलली पाहिजे, गोव्याच्या मुडकारांना जागेचा हक्क दिला पाहिजे, नाहीतर अजून काही भाटकार अशाच प्रकारे मुंडकारांची फसवणूक करत राहतील. आणि सध्याची परिस्थिती पाहता बाहेरच्या राज्यातील लोकांच्या नजरा गोव्याच्या जमिनीवर आहेत.- अमीर बेळेकर

गोव्यात अनेक मूळ गोमंतकीय कुटुंबे भाटकारांच्या जमिनीत अनेक वर्षांपासून राहत आहेत. एक चौदाच्या उताऱ्यावर त्यांची नोंद आहे परंतु त्यांना अजूनपर्यंत त्या जमिनीचा मालकी हक्क मुंडकार कायद्यानुसार देण्यात आलेला नाही. मामलेदार न्यायालयात वीस वर्षे खटले चालवूनही काही भाटकार मुंडकारांना जमिनीचा हक्क देण्यास टाळतात. सरकारने योग्य तोडगा काढून मुंडकारांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत- राजेंद्र पेडणेकर 

कसेल त्याची जमीन. भूमी पुत्राची जमीन भूमी पुत्रांना द्यावी. सरकारने यावर तोडगा काढायला पाहिजे व ज्यांची जमीन आहे त्यांना ती द्यावी. गोव्याची जमीन रीयल इस्टेट एजंटच्या घशात घालू नये- डॉ.अशोक कृ. प्रियोळकर

हेही वाचा