पावसाने घेतली पुन्हा उसंत

पावसाचे प्रमाण यंदा १.७ टक्क्याने घटले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 12:27 am
पावसाने घेतली पुन्हा उसंत

पणजी : गेले काही दिवस राज्यातील मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे पावसाचे प्रमाण पुन्हा एकदा तुटीत गेला आहे. राज्यात १ जून ते ३ जुलै दरम्यान सरासरी ३९.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. याकाळात साधारणपणे ४०.४९ इंच पावसाची नोंद होते. यंदा पावसाचे प्रमाण १.७ टक्क्यांनी कमी झाले आहे. हवामान खात्याने ७ जुलै पर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात चोवीस तासात १९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक ३.०३ इंच पावसाची नोंद झाली. त्यानंतर साखळीत २.३८ इंच, म्हापसा येथे १.२२ इंच पावसाची नोंद झाली. बुधवारी पणजीतील कमाल तापमान २.५ अंशाने वाढून ३२ अंश सेल्सिअस झाले होते. तर किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअस होते. मुरगाव येथे कमाल ३१ अंश तर किमान २७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात पुढील पाच दिवस कमाल तापमान २९ ते ३१ अंश तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी काही समुद्र किनाऱ्यांवर ३.६ मीटर उंचीच्या लाटा उसळन्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात १ जून ते ३ जुलै दरम्यान साखळी येथे सर्वाधिक ४८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर वाळपई येथे ४५.७८ इंच , सांगे येथे ४५.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे.                   

हेही वाचा