नवं जग

Story: छान छान गोष्ट |
30th June, 12:36 am
नवं जग

दिवे दिवे लागणीची वेळ झालेली. देवघरात आईने धुपबत्ती दाखवली आणि निरंजन नेऊन तुळशी समोर ठेवलं आणि मनोभावे तिने हात जोडले. तेवढ्यात खेळायला गेलेला विनू रडत रडतच अंगणात आला. दिवेलागणीला मुलगा रडतोय हे आईला खटकलं. तिने विनूला रडण्याचं कारण विचारलं तसं त्याने सगळं सांगितलं.

“मला वाड्यावरची मुलं आपल्या सोबत खेळायला घेत नाहीत. रोजच असं करतात. क्रिकेट खेळायला घेतात आणि फक्त मैदाना बाहेर गेलेले चेंडू आणायला पाठवतात. बॅटिंग पण देत नाहीत आणि बॉलिंग पण. लपाछपी खेळायला गेलो तर डाव फक्त माझ्यावरच देतात. मी यापुढे त्यांच्यासोबत खेळायलाच नाही जाणार.”

विनूच्या बाबतीत वाड्यावरची मुले अशी वागतात हे आईलाही ठाऊक होतं. परंतु तिने कधी त्यात लक्ष घातलं नव्हतं. मुलांच्यात मोठ्यांनी दखल नाही द्यायची या मताची ती. परंतु आज विनूची अवस्था तिच्याने पाहवेना.

“हे बघ, तुला जर जायचं नसेल ना, तर नको जाऊस पण मित्रांबद्दल मनात असा राग घालून घेऊ नकोस. आज ते तुला खेळायला घेत नसतील, कदाचित तुला त्यांच्या एवढं खेळायला येत नसेल. पण एक दिवस ते तुझ्याशिवाय खेळायलाच जाणार नाहीत असाही दिवस येईल. तेवढं आपण तयार व्हायचं.” तिने समजुतीच्या सुरात सांगितलं आणि विनूला घेऊन ती घरात गेली, त्याला आंघोळ घातली आणि देवासमोर प्रार्थनेला बसवलं. विनूही अगदी विनम्रपणे शुभंकरोती म्हणू लागला.

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मुलं घरीच होती. विनू आपल्या परसात बसून कसलासा खेळ खेळत होता. त्यांच्या परसात खूप ऐसपैस जागा होती. त्यात अनेक प्रकारची फुलझाडे शिवाय चिकू, पेरू, फणस आणि आंब्याची झाडे होती. त्या झाडांमुळे परसात दाट सावली भरून होती. वाराही घोळायचा. एवढं असलं तरी झाडावर फळे नव्हती. अधूनमधून एखादा पक्षी यायचा, इकडे तिकडे उडायचा आणि निघून जायचा. विनूला वाटायचं आपल्या परसातल्या झाडावर खूप पक्षी यावेत, दिवसभर त्यांनी तिथेच बागडावं, त्यांच्या चिवचिवाटाने परिसर गजबजून जावा. परंतु तसं होत नव्हतं.

वाड्यावरची इतर मुलं उनाडक्या करत फिरायची. खेळाबरोबरच त्यांचा अजून एक उपद्व्याप होता तो म्हणजे कुठेही बसलेले पक्षी दिसले की त्यांच्यावर दगड मारत त्यांना हाकलायचे. 

एक दिवस विनूची आई अंगणात तांदूळ निवडत बसली होती. विनू पेरूच्या झाडावर बसून पक्षी येतात का ते न्याहाळीत होता. आईला तांदूळ निवडताना पाहून त्याला काही तरी सुचलं. त्याने लगोलग झाडावरून उडी टाकली, धावतच आईजवळ आला, मुठभर तांदूळ घेतले आणि परसात नेऊन टाकले. 

काही वेळाने त्याठिकाणी एक पिवळ्या जांभळ्या रंगाचा सूर्यपक्षी (हमिंगबर्ड) उडत उडत आला आणि विनूने टाकलेले तांदळाचे दाणे टिपू लागला. ते पाहून विनू खूप खूश झाला. बघता बघता अजून दोन पक्षी तिथे आले आणि दाणे टिपू लागले. आई अंगणात बसून हे सर्व बघत होती. चिमण्यांपेक्षा आपल्या विनूला आनंदी पाहून तिचा चेहरा खुलला.

 दुसर्‍या दिवशी विनूने पुन्हा तांदूळ, थोडे नाचणी, थोडा रवा नेऊन परसात टाकला, दोन छोट्या भांड्यात पाणी ठेवलं आणि तो पेरूच्या झाडावर चढून बसला. थोड्याच वेळात तिथे सूर्यपक्षी, डोक्यावर काळा तुरा असलेला बुलबुल, साळुंकी असे वेगवेगळे दहा बारा पक्षी आले आणि स्वच्छंदपणे दाणे टिपू लागले. कुणी पाणी पिऊ लागले. दिवस भरात कितीदा तरी तिथे पक्षी आले, दाणे टिपून आणि पाणी पिऊन उडून जाऊ लागले.

आता विनूचा हा दिनक्रमच होऊन गेला. हळूहळू पक्षांची संख्या वाढली. झाडावर गजबज दाटली. पक्षांच्या चिवचिवाटाने त्याच्या घराचा परिसर दणाणून जाऊ लागला. विनूला आता बाहेर कुठे खेळायला जावसं वाटेना. दिवस दिवस तो त्या पक्षांच्या सहवासात रमू लागला. वाड्यावरच्या इतर मुलांना हा प्रकार कळला. ते सुद्धा कुतुहलाने बाहेरून हे सगळं न्याहाळू लागले. बघता बघता लाडीगोडी लावत ते आत यायला लागले. विनूसोबत ते पक्षांच्या सगळ्या कला पाहू लागले. आनंदून जाऊ लागले. विनूही त्यांना आपल्या सोबत घेऊ लागला. आता विनूच्या घराचं अंगण पक्षी आणि मुलांच्या चिवचिवाटाने गजबजून जाऊ लागलं. आपण एका नव्या जगात वावरत आहोत असं सगळ्यांना वाटू लागलं.


चंद्रशेखर शंकर गावस,  केरी-सत्तरी