पावसाळ्यात ओले कपडे वापरताय ?

सर्वांना आवडणाऱ्या, हवाहवासा वाटणाऱ्या पावसाळ्यात कुठे बाहेर निघायचे झाले की डोक्यावर आठ्या येतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या मंडळींना, शाळा-कॉलेजच्या मुलामुलींना यातून काही पर्याय नसतो. पावसाळ्यात छत्री रेनकोटचा वापर करूनही आपण थोडे न थोडे भिजतोच व कपडे ओले होण्याची समस्या वारंवार निर्माण होते. मग हे ओले झालेले कपडे वाळवणे ही देखील एक मोठी समस्याच असते.

Story: आरोग्य |
15th June, 12:35 am
पावसाळ्यात ओले कपडे वापरताय ?

पावसात बऱ्याच वेळा कपडे अर्धवटच वाळतात. कपडे नीट पद्धतीने वाळले नाहीत तर त्यांचा नकोसा असा गंध येऊ लागतो. पण, काहीच पर्याय नसल्याने कधी कधी कपडे तसेच घालावे लागतात. अशा स्थितीत पावसात भिजणे, ओले कपडे, ओली अंतर्वस्त्रे अंगावर घालून दिवसभर वावरणे, अर्धवट वाळलेले कपडे घालणे, या सर्व गोष्टींमुळे आपले शरीर ओलसर राहून अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतात.

इन्फेक्शनचा धोका वाढणेः 

ओले कपडे व अंतर्वस्त्रे शरीरावर तशीच राहिल्यास ओलाव्यामुळे उबदार आणि ओलसर वातावरण तयार होते. यामध्ये जीवाणू, बुरशी, यीस्टची वाढ होऊ शकते. या सूक्ष्मजीवांच्या उपस्थितीमुळे विविध इन्फेक्शन होऊ शकते. त्याचप्रमाणे, ओले कपडे जिवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण प्रदान करून मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढवू शकतो. खासगी भागासोबत काखेत हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

फंगल इन्फेक्शन होणे : 

त्वचा ओलसर राहिल्यामुळे हाता-पायाच्या खाचेत, काखेत, जांघेत खाज येते व इन्फेक्शन होते. रिंगच्या आकारातील, लालसर रंगाचे व प्रचंड खाज सुटणारे गजकर्णसारखे इन्फेक्शन हातावर, पाठीवर, पोटावर, चेहरा आणि डोक्यावर होऊ शकते. हा आजार लहानांपासून-मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. हा त्रास संसर्गजन्य असल्याने एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो.

त्वचेची जळजळ होणेः

ओले कपडे जास्त वेळेपर्यंत शरीराच्या संपर्कात राहिल्याने ओलाव्यामुळे त्वचेच्या नैसर्गिक संतुलनात व्यत्यय येऊन, त्वचेची जळजळ होऊ शकते. पुरळ येणे व खाज सुटणे हे देखील दिसून येऊ शकते. ओले कपडे व त्वचा यांच्यातील घर्षणामुळे जळजळ आणखी वाढू शकते आणि अस्वस्थता होऊ शकते. मांडीच्या भागात हे जास्त करून दिसून येते.

दुर्गंधी आणि अस्वस्थता होणेः ओलसरपणामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्याने अप्रिय असा वास येऊ शकतो, दुर्गंधी निर्माण होऊ शकते. सतत ओलसरपणामुळे अस्वस्थता आणि दिवसभर ओलेपणाची भावना निर्माण होऊ शकते. यामुळे सतत विचलित वाटू शकते. 

तापमान नियमनावर परिणामः 

ओल्या कपड्यांमुळे आपल्या शरीराच्या नैसर्गिक तापमान नियमनाच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. ओल्या कपड्यामधील ओलाव्याची वाफ झाल्यामुळे, ती आजूबाजूचा परिसर थंड करते. यामुळे आपल्याला थंडी जाणवू शकते. थंड आणि ओलसरपणामुळे होत असणारी अस्वस्थता आरोग्यावर परिणाम करते व आपल्या शरीराचे तापमान किंचित कमी करू शकते.

बुरशीची वाढ होणेः 

कपडे जास्त काळ ओले राहिल्याने कपड्यांवर बुरशीची वाढ होऊ शकते. बुरशी, मोल्ड स्पोर्स यामुळे सेंसीटिव्ह व एलर्जी असलेल्या लोकांमध्ये ऍलर्जी आणि श्वसन समस्या उद्भवू शकतात. बुरशीमुळे डाग पडणे, कपड्यांचा रंग उडणे यामुळे कपड्यांचे नुकसान होऊ शकते.

पावसाळ्यात या गोष्टी टाळाः 

या समस्या टाळण्यासाठी आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी, पावसाळ्यात घट्ट कपडे घालणे टाळावे. त्यापेक्षा सैलसर, कॉटनचे कपडे घालावे. जे पावसात भिजले तरी लवकर वाळले जातात व ओलसरपणा राहत नाही. ओले झाल्यानंतर भिजलेल्या स्थितीत तसेच न वावरता शरीर शक्य होईल तितके वाळवावे, शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घालावे. खासगी भाग कोरडा व स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी. तसेच आपले कपडे परिधान करण्याआधी किंवा ते घडी घालून ठेवण्याआधी पूर्णपणे वाळलेले आहेत का, याची खात्री करून घ्यावी. दुर्गंधी व ओलसरपणा टाळण्यासाठी कपडे घरामध्ये हवेशीर भागात वाळवावे. शक्य असल्यास ऑफीसमध्ये कपड्यांची अजून एक जोड ठेवावी. त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी हात-पायांच्या बोटांमधील जागा पूर्ण कोरडी करावी, पूर्णपणे वाळलेले अंतर्वस्त्र वापरावे, ओले मोजे वापरू नयेत. फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी ओल्या चप्पल- बूटातील पाणी पूर्ण काढून ते वाळवावे.  दुसऱ्यांचा कंगवा, टॉवेल किंवा कपडे वापरू नये. हाता-पायांची नखे वेळच्यावेळी कापावीत, अॅटी-फंगल साबण वापरावा. एकंदर आपण काही गोष्टींची काळजी घेतल्याने आणि स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने पावसाळ्यातील ही स्थिती हाताळणे सोपे होते.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर