भारताच्या विश्वविक्रमी विजयाने पाकिस्तानची नाचक्की!

Story: क्रीडारंग |
11th June, 12:41 am
भारताच्या विश्वविक्रमी विजयाने पाकिस्तानची नाचक्की!

रविवारी भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वियश्री अक्षरश: खेचून आणली. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये खेळवला गेलेला हा सामना अमेरिकन नागरिकांना कायम स्मरणात राहील.

विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सर्वच्या सर्व सामने जिंकून एकतर्फी दबदबा राखला आहे. तर टी-२० विश्वचषकामध्येही पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकात आतापर्यंत एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सात सामने भारताने जिंकले आहेत, तर २०२१ मध्ये भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

रविवारी भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० मधील सातवा विजय नोंदवला. या विजयासोबतच भारतीय संघाने एक नवा विश्वविक्रम रचला. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला. याआधी टी-२० विश्वचषकात कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सहा वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेनेही वेस्ट इंडिजचा सहा वेळा पराभव केला आहे. पाकिस्तानला हरवून भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. पाकिस्तानचा विक्रम मोडून भारताने इतिहास रचला. या सामन्यात भारतीय संघाने केवळ ११९ धावा केल्या होत्या. चांगली सुरुवात होऊनही अखेरच्या षटकांमध्ये पाकिस्तानचे फलंदाज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. पाकिस्तान संघाला २० षटकात केवळ ११३ धावा करता आल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारताने बचाव केलेले हे सर्वांत छोटे लक्ष्य आहे. यापूर्वी २०१६ मध्ये भारताने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध १३९ धावांचा यशस्वीपणे बचाव केला होता. भारतीय विजयाचे खरे शिल्पकार गोलंदाज ठरले. या सामन्यात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा खतरनाक फलंदाज मोहम्मद रिझवान (३१), कर्णधार बाबर आझम (१३) आणि इफ्तिखार अहमद (५) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर बुमराहने आपल्या स्पेलमध्ये फक्त १३ धावाच खर्च केल्या. बुमराहने पाकिस्तानचे हे तीन महत्त्वाचे बळी घेतले नसते तर भारत हा सामना कदाचित जिंकू शकला नसता. त्यामुळे भारतासाठी खरा ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराह ठरला. फलंदाजीत ऋषभ पंतने दबावाखाली ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऋषभ पंतने ही अवघड खेळी अशा वेळी खेळली, जेव्हा टीम इंडियाचे एकापाठोपाठ एक बळी पडत होते. मात्र दबावाखाली पंतने आपली फटकेबाजी कायम ठेवली होती. ऋषभ पंतच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारतीय संघाला ११९ धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारतीय गोलंदाजांनी या धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव केला. पहिल्यांदा अमेरिकेकडून आणि आता भारतीय संघाकडून मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. सर्व स्तरातून पाकिस्तानी संघ टीकेचा धनी ठरत आहे. अक्रम, वकार युनूस सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी थेट बाबरला लक्ष्य केले आहे. तर पीसीबीच्या अध्यक्षांनी संघात मोठे बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा विश्वचषक पाकिस्तानसाठी फारच खडतर जाणार हे नक्की!

- प्रवीण साठे, गोवन वार्ता