कोविड काळात अश्विनीची भरारी

कोविड महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढवले आणि या धावत्या जगाचे सर्व व्यवहार काही काळासाठी ठप्प पडले. या स्थितीतही काही स्त्रियांनी हिंमत न हारता पदर खोचून आपली कल्पकता सिद्ध केली, तर काही स्त्रियांनी आपल्यातील कलागुणांना वाव देत उत्पन्नाचे साधन सुरू केले.

Story: तू चाल पुढं |
08th June, 12:34 am
कोविड काळात अश्विनीची भरारी

बाजारात रेडिमेड पाकिटात मिळणारी पिठे बाजारात येतात तेव्हा त्यातील पीठ हे कित्येक दिवस आधी दळलेले आणि पॅकबंद अवस्थेत असते. बाजारात आल्यावर ते आपल्या स्वयंपाकघरात येईपर्यंत त्याला बराच कालावधी लोटून गेलेला असतो.

जेवणात लागणारी गव्हाच्या पिठाची चपाती किंवा तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीच्या पिठाची भाकरी ही जर ताज्या दळलेल्या पिठाची असेल, तर त्याची चव एकदम न्यारीच लागते. असे हे ताजेताजे दळलेले पीठ आपल्याला मांडोप येथील गृहिणी, अश्विनी चव्हाण या उपलब्ध करून देत आहेत.

पदवीधारक असलेल्या अश्विनी चव्हाण यांनीही कोविड काळात अवघ्या जगावर संकटाची कुर्‍हाड कोसळली तेव्हा हिंमत न हारता अनेक व्यवसाय घरात सुरू केले. लाडू, चिवडा, पुरणपोळी अश्या पदार्थांसोबतच खाण्याचे जिन्नस तयार करताना अनेकांना जेवणाचे डबे पोहचवण्याचे त्यांनी काम केले. अशातच त्यांनी पिठाची गिरण सुरू करण्याचा निश्चय केला व त्यानुसार त्यांनी एक घरगुती दळण दळण्याची मशीन विकत घेतली आणि त्यानुसार मग ग्राहकांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादींचे दळण दळून देण्याचा व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला ग्राहक जरी कमी असले, तरी आज त्यांचे ग्राहक बर्‍याच प्रमाणात वाढले आहेत. शक्य तितक्या लवकर दळण दळून देणे, ग्राहकांशी उत्तम व्यवहार, कामात चोखपणा यामुळे अश्विनी यांनी या व्यवसायात बरीच प्रगती केली आहे. आज फक्त गहू आणि तांदूळ नाही, तर ज्वारी, बाजारी, नाचणी, सोयाबीन, चणाडाळ, उडीदडाळ आदी त्या मशीनमध्ये दळून देतात.

प्रत्येक स्त्री ही जिद्द, चिकाटी याचे मूर्तीमंत उदाहरण आहे आणि याचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत असतो. हाच प्रत्यय आपल्याला अश्विनी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही दिसून येतो. ग्राहकांना फक्त दळण दळून देण्यापुरत्या त्या स्वस्थ बसल्या नाहीत. नोकरी व्यवसाय करणार्‍या काही स्त्रियांना बाजारात जाऊन गहू विकत घेऊन ते दळून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. अशा स्त्रियांसाठी त्यांच्या मागणीनुसार स्वतः तयार केलेले ताजे पीठ त्या पुरवतात त्यामुळे नोकरी, व्यवसाय करणार्‍या स्त्रियांचा बाजारात जायचा त्रास वाचतो. अश्विनी यांना एक फोन करून सांगितले की त्या ग्राहकांच्या जरुरीनुसार ते ते धान्य दळून त्यांच्यासाठी ताजे पीठ तयार ठेवतात. त्यामुळे ग्राहकांचाही वेळ वाचतो आणि त्यांना ताजे पीठ लगेच एक फोन केल्यावर मिळू शकते. त्यामुळे अश्विनी यांची सेवा अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

जर एखाद्या स्त्रीला त्यांच्या घरी येऊन दळलेले ताजे पीठ नेण्यास काही अडचण होत असेल, तर त्या एक कि.मी. अंतराच्या परिघात राहणार्‍या ग्राहकांना स्वत: स्कूटरने जाऊन त्यांच्या ऑर्डर पोहोचवून येतात. त्यांचे पती अभिजीत हे पेशाने इंजिनियर आहेत. आपल्या पत्नीने कोविडच्या अवघड काळात सुरू केलेला हा व्यवसाय जोमाने सुरू ठेवलेला पाहून त्यांनाही आपल्या पत्नीचे विशेष कौतुक वाटते आणि ते त्यांना जमेल तसे त्यांच्या कामात मदतही करतात.

अश्विनी या उत्तम शिवणकाम करतात. विविध तर्‍हेचे, फॅशनचे ड्रेसेस शिवण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच लहान मुलांचे ड्रेसेस, शाळेचे गणवेश, विविध प्रकारच्या फॅशनचे ब्लाऊज, तसेच विविध प्रकारच्या फॅशनचे ड्रेसेसही त्या शिवतात. या कलेतही त्यांचे प्रावीण्य आहे. अश्विनी यांनी कोविड काळात सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्या मेहनतीमुळे, कष्टामुळे आणि तत्परतेमुळे आता चांगला आकार घेत आहे. त्यामुळे त्यांना म्हणावेसे वाटते...  “अश्विनी, तू चाल पुढं!”


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव