मांडवी नदीच्या काठावरील ११ बेकायदा होर्डिंग पाडा!

सीआरझेड उल्लंघनामुळे गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 12:13 am
मांडवी नदीच्या काठावरील ११ बेकायदा होर्डिंग पाडा!

पणजी : मांडवी नदीच्या किनारी असलेल्या दारू, गुटखा आणि कॅसिनोची जाहिरात करणारे ११ बेकायदेशीर होर्डिंग पाडण्याचे आदेश गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामध्ये वाहतूक खाते आणि कॅप्टन ओफ पोर्ट्सच्या शासकीय जागेवरील बेकायदा होर्डिंगचा समावेश आहे.

मांडवी नदीच्या काठावर पर्वरी-बेती परिसरात दारू, कॅसिनो, गुटखा व इतर व्यवस्थापनाच्या जाहिरात करणारे अनेक होर्डिंग आहेत.

उच्च न्यायालयाने एनडीझेड परिसरातील होर्डिंगवर चिंता व्यक्त करत हे प्रकरण गांभीर्याने घेतले. उच्च न्यायालयाने नंतर अधिकाऱ्यांना होर्डिंगची पाहणी करून उल्लंघन आणि पर्यावरणाच्या हानीचा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून होर्डिंग मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर प्राधिकरणाने नोटीसला उत्तर देण्यासाठी मालकांसोबत सुनावणी घेतली.

वाहतूक खाते आणि बंदर कप्तान यांच्या मालमत्तांमधील जय डेव्हलपर्सचे दारुचे होर्डिंग पाडण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

तर कृष्णा नाईक, डँडी बग्स इन्कॉर्पोरेशन, रोमियो फर्नांडिस आणि कार्मिन फर्नांडिस यांचे प्रत्येकी दोन, जामिनी परब, केशव मळीक, विनायक भांडीये, श्याम भांडीये, मनोहर भांडीये, श्रीधर भांडीये, प्रीता क्रिएशन आणि उज्वला ॲडव्हर्टायझिंग यांना आपले होर्डिंग पाडण्याचे आदेश दिले आहेत.

तर लियोनारा फर्नांडिस यांचे दोन होर्डिंग सीआरझेड क्षेत्राबाहेर असल्याने ते कारवाईतून सुटले. सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल प्राधिकरणाने १८ होर्डिंग मालकांना पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

परवानगी न घेता उभारले होर्डिंग

सुनावणीवेळी दिसून आले की, सीआरझेड क्षेत्रात होर्डिंग उभारुन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले तसेच ते उभारताना संबंधितांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. हे होर्डिंग १९९१ पूर्वी उभारण्यात मालकांना अपयश आल्याने प्राधिकरणाने ते पाडण्याचे आदेश दिले.

हेही वाचा