‘बाई’पण भारीच देवा…

आपण आपल्या लहानपणापासून गंगूबाई, शांताबाई, पार्वतीबाई, लक्ष्मीबाई अशी अनेक नावे आणि वेगवेगळी रुपे, अवतार घेऊन तुमच्या आमच्या जीवनात साकार झालेली बाई पाहत आलो. आताची त्यांची नावे जरा मॉडर्न असतील, नमुना तोच पण जरा सुधारित. आपल्याला गरज असताना न चुकता वेळेवर येते तेव्हा अगदी ‘बाई थोर तुझे उपकार’ म्हणत तिचे पाय धरावेसे वाटतात.

Story: मनातलं |
01st June, 04:45 am
‘बाई’पण भारीच देवा…

सणावाराची गडबड, घरात पाहुण्यांचा राबता अशा वेळी नेमकं कामवाल्या बाईलाही काहीतरी अर्जंट महत्त्वाचं कारण सापडतं न येण्याचं; आणि मग अशा वेळी कामवालीची किंमत कळते आपल्याला. एरव्ही तिला आपण गृहीतच धरत असतो पण अशावेळी ‘आता बरी अद्दल घडली’ असे घरातले वातावरण तयार होते. तिच्या एवढ्याश्या चुकीवर तोंडसुख घेणाऱ्या तोंडांना मग मूग गिळून गप्प बसल्याशिवाय पर्याय उरत नाही. 

कधी तिला चुचकारत, स्तुती करत, कसलं तरी आमिष दाखवत ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ म्हणत बरेचदा डोक्यावर चढवून ठेवलेलेच असते, पण दुसऱ्याच्या घरात काम करणाऱ्या बाया पाहिल्या की ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असे म्हणत समाधान करून घ्यावे लागते. माझ्या एका मैत्रिणीकडे येणारी कामवाली मोठ्या टेचात स्कूटीवरून ठराविक वाजताच येणार. तुम्ही घरी असो की नसो, रविवारी तिला हक्काची सुट्टी हवी. कधी रविवारच्या कामासाठी विचारले तर ती म्हणते, “ते तुमचं तुम्ही बघा. कुठंतरी फिरायला जा, हॉटेलात जेवायला जावा, पिकनिक करा, म्हणजे तुमचीबी सुट्टी चांगली जाईल आणि माझीबी बरी जाईल.” 

आमच्या कामवालीला तर हल्ली पूर्वीसारखे दिवाळसणाला साडी, कपडे नको असतात. आता एक महिन्याचा पगारच द्या म्हणते जास्तीचा. मी माझ्या आवडीने घेते म्हणते. घरातला प्रॉब्लेम हा हा म्हणता गावभर पसरवायची जबाबदारी जणू यांची असते. इंटरनेटपेक्षाही यांचे नेटवर्क स्ट्रॉंग असते. त्यांच्या पोटात कुठली म्हणून गोष्ट रहात नाही. ती कुणाला तरी सांगितली नाही, तर जणू यांच्या पोटात दुखते. त्या गोष्टीतल्या राजाच्या न्हाव्यासारखी ‘राजाला गाढवासारखे लांब कान’ ही गोष्ट न्हावी गावभर सांगेल म्हणून राजा दम देतो, तर न्हावी खोल खड्डा खणून ती गोष्ट जोरात ओरडून सांगतो तसेच. पण कशीही, अगदी सर्वगुणसंपन्न किंवा अवगुणसंपन्न असली तरी आपले काही तिच्यावाचून पान हालत नाही. माझी एक गोवन मैत्रीण म्हणते, “मला एकवेळ जेवायला नसलं तरी चालेल, पण कामवाली घरात पाहिजेच. त्याशिवाय माझं चालत नाही.” तिच्याच घरी तिने एकदा नाईलाजास्तव एका कामवालीला हात मारायची सवय आहे हे माहीत असूनसुद्धा ठेवून घेतले होते. तिला अचानक बाहेरगावी जावे लागले होते. ‘गरजवंताला अक्कल नसते’ म्हणतात ना, ते खरंय. तिला सीसीटीव्हीचा खोटा धाकही दाखवला होता. अर्थात तिची ही थाप किती पचली देवच जाणे. 

आणखी एका मैत्रिणीकडची कामवाली तिला जरा काही बोलले, तिची चूक दाखवून दिली की ती डोळ्याला पदर लावून रडायलाच सुरू करते. मग मैत्रिणीची अवस्था ‘भीक नको कुत्रा आवर’ अशी होऊन जाते. या कामवाल्यांचीपण बाहेर युनियन असते असे वाटते. एरव्ही एका कामवालीबद्दल दुसरी कधी चांगले बोलताना दिसत नाही; पण पगारवाढ, बोनस, पगारी सुट्टी अशा बाबतीत त्यांची एकी असते. चांगली कामवाली मिळणे हा नशिबाचा भाग मानला पाहिजे. नाहीतर काहींना वाईट सवयी, व्यसने असतात. ह्या असल्या सगळ्या गोष्टी नजरेआड कराव्या लागतात. माणूस आहे; गुणदोष तर असणारच!  

एका मैत्रिणीकडे बरीच वर्ष कामाला असलेल्या बाईला सात मुलींवर आठवा मुलगा झाला. तिच्या प्रत्येक मुलीच्या लग्नात, साखरपुड्यात, बाळंतपणात अशा कारणासाठी ती वारंवार सुट्ट्या तर घेतेच, वर तिला आहेरही करावा अशी तिची अपेक्षा असते. मैत्रिणीला तिची दया येते. “असू दे! ती तरी बिचारी काय करणार? संसाराचा गाडा ओढायचा म्हणून तर ती कामं करते बिचारी. तेवढाच आपला हातभार होतो तिला. त्यांची पण काही दु:खं असतात. काही कारणांमुळे त्यांना आपला चरितार्थ चालवण्यासाठी अशी लोकांची धुणीभांडी करावी लागतात. त्यांचीही काही कारणे असतात, काही मजबूरी असते. हे आपल्या सारख्या बायकांनी समजून घेतले पाहिजे. आज त्यांच्या जिवावर आपण मजा मारू शकतो ही जाणीव मनात ठेवली पाहिजे. त्यांचेही आयुष्य काही सोप्पे नसते. कामवाली बाई म्हणजे तिच्याकडे बघायच्या नजरा कधी विखारी, हपापलेल्या, कधी हीनतेच्या, तुच्छतेच्या असतात. तिचाही काही प्रॉब्लेम असू शकतो याचा कुणी विचार करत नाही. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा विचार केला पाहिजे. तिचा जीव जाणला, तर ती आपला विचार करेल. ती खूश, तर आपलं घर स्वच्छ असा विचार केला पाहिजे.” असा मैत्रिणीचा विचार. तिचेही तत्वज्ञान पटते मनाला.  

 बाहेरच्या देशातली परिस्थिती पाहिली. की कधीकधी आम्ही कामवालीच्या बाबतीत सुखी असल्याचे जाणवते. इथे वेगवेगळ्या, लहानमोठ्या घरगुती कामांसाठी बाई मिळणे सोप्पे आहे. गोव्यात जास्तश्या कन्नड भाषिक कामवाल्या दिसतात. आता काही ठिकाणी नेपाळी, बिहारी बायका पण दिसतात. मागणी तसा पुरवठा - या प्रमाणे त्यांची मागणी किंवा गरजही वाढतच जाणार यात शंका नाही. नोकरी आणि घर सांभाळण्याची तारेवरची कसरत करणारी आजकालची स्त्री सोय होणार असेल, तर थोडे पैसे गेले तरी चालतील असा विचार करून कामवाली ठेवतेच ठेवते. त्यामुळे आजकालची कामवाली बाई ही खरोखरीच ‘लई भारी’ म्हणावसे वाटते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा.