पावसाळ्याची चाहूल

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
26th May, 05:39 am
पावसाळ्याची चाहूल

सध्या गर्मीचा पारा भरपूर उंचावलेला आहे. बाहेर उकाडा खूप आहे. दुपारी घरातून बाहेर जाणं तर अगदी नकोसं झालं आहे ना? रखरखीत ऊन, तापलेला रस्ता, गरम वारा आणि वाढलेल्या गर्मीमुळे शरीराचा दाह होत असताना मधेच गेल्या काही दिवसात एक-दोनदा पाऊस पडून गेला व पडलेल्या पावसामुळे मन प्रसन्न झाले. तात्पुरता का होईना पण गर्मीपासून सर्वांना थोडा दिलासा मिळाला आणि येणाऱ्या पावसाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली.

सध्या वाढलेल्या रखरखीत उन्हात सावलीत कुठे तरी थांबावं असा विचार डोक्यात जरी आला तर थंडगार सावली देणारं एखादं मोठं झाड आजूबाजूला कुठेच दिसत नाही. म्हणूनच आम्ही सर्वांनी हा उकाडा कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला पावसाळ्यात छोटी छोटी रोपं लावायचा प्रयत्न करायला हवा.


आता पावसाळा सुरू होणार म्हणून खूप गरम होत असलं तरी फ्रीजमधील पदार्थ, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक घेणं खूप कमी करा व शक्य असल्यास बंद करा. असं का? तर वातावरणात सारखे बदल म्हणजेच आत्ता उकाडा तर अचानक दमट हवामान आणि काही तासांनंतर ढगांचा गडगडाट आणि मोठा पाऊस असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या शरीरात बदल होतात आणि या बदलांचा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणजे हे बदल होत असताना आईस्क्रीम किंवा इतर थंड पदार्थ खाल्ले तर सर्दी, खोकला, दमा, ताप असे आजार होऊ शकतात. आणि शाळा सुरू होताना आपल्याला अगदी फ्रेश, हेल्दी आणि प्रसन्न मूडमध्ये शाळेत जायचं आहे की नाही? मग अश्या वातावरणातील बदलांमुळे त्रास होऊ नये म्हणून थंड पदार्थ हळूहळू कमी करून बंद करूया. 

थंड पाण्याने आत्ता रोज आंघोळ करत असाल तर, संध्याकाळी सूर्यास्तानंतर आंघोळ करत असताना एकदम थंड पाणी न वापरता कोमट पाण्याने अंघोळ करा. 

जर आपण घरी एसी वापरत असाल तर, दिवसभर व रात्रभर एसीचा वापर करणे टाळा. खूप गरम होत असेल तेव्हाच एसी सुरू करा.

नाकाला आतून खोबरेल किंवा तीळ तेल दिवसातून ३-४ वेळा लावायला सुरुवात करा, म्हणजे तापमानात होणाऱ्या बदलांमुळे लगेच सर्दी होणार नाही. 

असे काही छोटे छोटे बदल आत्तापासून केले तर शाळा सुरु होताना तुम्ही आजारी पडणार नाही आणि पावसाळा सुद्धा मस्त एन्जॉय करता येईल. चला तर मग बदलत्या वातावरणातही स्वतःला निरोगी ठेवूया व येणाऱ्या पावसाळ्याच्या स्वागतासाठी सज्ज होऊया.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य