गरज पक्षी संवर्धनाची

जगभरात हल्लीच जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा करण्यात आला. स्थलांतर करणारे पक्षी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ११ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

Story: साद निसर्गाची |
26th May, 05:27 am
गरज पक्षी संवर्धनाची

खाद्याचा तुटवडा असल्यामुळे, प्रजननासाठी किंवा हवामान बदलामुळे जगभरातील पक्षी एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतर करत असतात. सायबेरिया, रशिया, तिबेट अशा कित्येक भागातील पक्षी, हजारो किलोमीटरचा प्रवास करुन पश्चिम घाट व इतर ठिकाणी स्थलांतर करतात. पक्ष्यांनी एका भागातून दुसऱ्या भागात केलेले स्थलांतर पृथ्वीवरील जैवविविधता राखून ठेवण्यास मदत करते. 

स्थलांतर करणारे पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करताना मध्यवर्ती ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबतात. विश्रांतीसाठी थांबलेल्या ह्या रेताळ, चिखलाळ, पाणथळ, किनारपट्टी भागांना 'स्टेजिंग ग्राउंड्स' असे संबोधले जाते. स्थलांतर करणारे पक्षी विश्रांतीसाठी एखाद्या तळ्याकाठी, नदीच्या तीरावर, आर्द्र प्रदेशात किंवा सरोवरावरदेखील थांबू शकतात. हे पक्षी दूरवर, मध्यवर्ती ठिकाणी किंवा मूळ ठिकाणापासून कुठेतरी जवळपासच्या ठिकाणी स्थलांतर करु शकतात. काही पक्षी वातावरणात अपेक्षित अशी अनुकूलता जाणवल्यास स्थलांतर केलेल्या भागात कायमस्वरुपीही मुक्काम करु शकतात. 

गोव्यात अशी अनेक स्टेजिंग ग्राउंड्स आहेत जिथे दूरवर स्थलांतर करणारे पक्षी पाणी पिण्यासाठी थांबतात. सांताक्रूझमधील बोंडवल तलाव, आगशीतील सुलाभाट तलाव, शिरोडेतील तारवलेम व उद्देन तलाव, दिकरपालचा पाली तलाव, केपेतील शेल्डे व नंदा तलाव, चिंबलमधील तोय्यार, रेवोडेतील दाशी, चिंचीणीतील सरझोरा तलाव, कोठंबी तलाव, करमळी तलाव, साळगांव पिळर्ण सॉलेम तलाव, खांडेपारमधील पंचमी तलाव, प्रियोळमधील कोने तलाव हे गोव्यातील काही लोकप्रिय असे स्टेजिंग ग्राउंड्स!

आधुनिकीकरण, शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे हवामानात होणाऱ्या बदलाचा फटका फक्त माणसालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येक घटकाला बसत आहे. हवामान बदलामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचे पारंपरिक मार्ग बदलत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत यंदा ४४ टक्क्यांनी घट झाल्याचे संशोधक सांगतात. पक्ष्यांचे आवाज, उड्डाणाचे नमुने, शारीरिक स्वरूप, उड्डाणाचा मार्ग, नैसर्गिक अधिवासात मिळणाऱ्या मूलभूत गरजांचे नमुने व स्थलांतर पद्धती यांसारख्या अनेक पैलूंचा अभ्यास केल्यानंतर पक्षी शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे.

सेल-फोन टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रो-मॅग्नेटिक रेडिएशनमुळे चिमणीची अंडी आणि भ्रूण फुटतात, हे संशोधनातून दिसून आलेले आहे. कवोलाडो राष्ट्रीय उद्यान, भरतपूर-राजस्थान येथे २००२ मध्ये मोठ्या संख्येने दिसून आलेले दुर्मिळ सायबेरियन पांढरे क्रेन भारतात परत कधीच दिसले नाही. स्थलांतराच्या ठिकाणी पाणी आणि अन्नधान्याची कमतरता हे ह्यामागचे मुख्य कारण. फेब्रुवारी २०२४ मध्ये नॉर्दर्न पिनटेल बदक व लेसर सॅन्ड प्लावर हे दूरवर स्थलांतर करणारे असंख्य पक्षी तमिळनाडूमधील अन्नमलायचेरीमध्ये मेलेल्या अवस्थेत सापडले होते. कीटकनाशके व रासायनिक खतयुक्त खाण्याची विषबाधा झाल्यामुळे हे पक्षी मरण पावल्याचे संशोधकांचे मत आहे.

गोव्यात दरवर्षी पक्षी महोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने पक्ष्यांबद्दल जनजागृती निर्माण करणे, पक्षी संरक्षण आणि संवर्धन ह्या विषयावर परिसंवाद व वेबिनार घडवून आणणे, जंगलभ्रमंती, पक्षी-निरीक्षण यासारखे कितीतरी उपक्रम राबवले जातात. पण एका महोत्सवाची सांगता ते पुढच्या वर्षीच्या पक्षी महोत्सवाचे आयोजन ह्या कार्यकाळामध्ये पक्षी संरक्षण व संवर्धनाचा विषय अपेक्षित अशा आक्रमकतेने हाताळला जात नसल्याचे दुःख पक्षीप्रेमी व पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या महाधनेश (मलाबार ग्रेट हॉर्नबिल) व राखाडी धनेश (मलाबार ग्रे हॉर्नबिल) सारख्या पक्ष्यांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या हेच सूचित करते. डोंगर चिरुन तयार केलेले रेल्वेमार्ग पक्ष्यांच्या उड्डाण मार्गात अडथळा निर्माण करतात. कचऱ्याची अयोग्य प्रकारे लावलेली विल्हेवाट, वायू प्रदूषणात होणारी वाढ, पाणथळ जागा आणि जलस्रोतांचा नाश, सांडपाण्यावर योग्यरित्या प्रक्रिया न करणे, मोकळ्या पठारावर कचऱ्याचे ढिगारे, ओसाड टाकलेल्या खाजन जमिनी, उथळ आणि ओलसर जमिनींचा व पाणवठ्यांचा केलेला नाश, विकासाच्या विळख्यात अडकलेली खारफुटी यासारख्या कित्येक कारणांमुळे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. स्थानिक प्रजाती व स्थलांतरित प्रजातीच्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी पाणथळ जागा संरक्षित करणे आवश्यक आहे. एखाद्या भागात पाणी साठवण्यासाठी लहान-लहान खड्डे मारणे, बागेत फळा-फुलांची झाडे लावून पक्ष्यांना आकर्षित करणे, नैसर्गिक झऱ्यांचे जतन करणे, सपाट भांड्यात पक्ष्यांना पिण्यासाठी, आंघोळीसाठी पाणी ठेवणे यासारख्या छोट्याछोट्या गोष्टीदेखील पक्षी संरक्षणाला हातभार लावतात. पक्षी स्थलांतर क्षेत्रांचा नकाशा बनवणे, पक्षी सर्वेक्षण करणे, पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे, इबर्ड भारत सारख्या संकेतस्थळावर स्थळाचे नाव नमूद करत आपण पाहिलेल्या पक्ष्यांच्या नावाची नोंद करणे ह्यासारख्या गोष्टी पक्ष्यांचे संवर्धन करण्यास मदत करतात. इबर्ड भारत हा शास्त्रज्ञ, संशोधक आणि निसर्गप्रेमींना पक्ष्यांच्या वितरण व विपुलतेबद्दल ताजा डेटा प्रदान करणारा पक्षी निरीक्षणाचा ऑनलाइन डेटाबेस आहे. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन किंवा संरक्षण ही कैक दिवसांसाठी राबवून बंद करण्याची प्रक्रिया नसून अविरत चालू ठेवण्याची प्रक्रिया आहे. पर्यावरणीय वारशाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे.


स्त्रिग्धरा नाईक