‘ॲक्टीव्हीटी बेस्ड’ शिक्षण पद्धतीद्वारे होणार अंतर्गत मूल्यांकन
पणजी : ही बातमी आहे गोव्यात यापुढे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. शिक्षकांसाठी आणि पालकांसाठीही. यंदा दहावीच्या सर्व विषयात अंतर्गत मूल्यांकन हे अधिक कृतीयुक्त (ॲक्टीव्हीटी बेस्ड) पद्धतीने होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लेखनासह संशोधन करणे, सादरीकरण (पीपीटी) करणे, दृकश्राव्य माध्यमांचा वापर करणे, सूत्रसंचलन करणे, मुलाखत घेणे, पथनाट्य, ध्वनीचित्रफित तयार करणे अशा विविध गोष्टी करता येणार आहेत. यामुळे त्यांना अभ्यासासह अन्य आवश्यक अशा विषयांतील कौशल्य विकसित करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठी , कोकणी आणि इंग्रजी या भाषा विषयांसाठी विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन कला, संभाषण कला, सादरीकरण कला आणि ऐकण्याची क्षमता अशा निकषावर अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्याला तो विषय किती समजला आणि त्याला त्या विषयाची आवड आहे का हे समजणे सोपे जाणार आहे. कृतीयुक्त अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना केवळ शाळेत न राहता शाळेबाहेरील उपक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
कोकणी विषयातील अंतर्गत मूल्यांकनासाठी एकूण चार गटांत उपक्रम देण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील एक उपक्रम करणे आवश्यक आहे. यातील डिजिटल गटात ५ ते ७ मिनिटांची ध्वनिचित्रफीत तयार करावी लागणार आहे. यामध्ये गोव्यातील धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक स्थळांची माहिती, आठवडी बाजार, फेस्ट जत्रा अशा गोष्टी व्हिडिओ स्वरूपात मांडाव्या लागतील. सादरीकरण गटात कविता रचून त्या सादर करणे, वक्तृत्व, कथाकथन असे उपक्रम आहेत.
तर संघटन या गटात नाटकाचे सादरीकरण पारंपरिक खेळ, लोकनृत्य , पथनाट्य , वाद विवाद या उपक्रमांचा समावेश आहे. मराठी विषयाच्या अंतर्गत मूल्यांकनासाठी दहा उपक्रम देण्यात आले आहेत. यातील एक किंवा त्याहून जास्त उपक्रम राबवणे आवश्यक आहे. यात वाचन, लेखन, कविता गायन, साहित्यिक, शिक्षक किंवा लोककलाकारांची प्रकट मुलाखत घेणे, शालेय कार्यक्रमात सूत्र संचालन, भाषण, आभारप्रदर्शन, पाहुण्याचा परिचय करून देणे , पथनाट्य ,एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करणे, कविता किंवा पाठावर ध्वनीचीत्रफीत अथवा पीपीटी तयार करणे या उपक्रमांचा समावेश आहे.
गोवा शालान्त शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी सांगितले की, यावर्षीचे अंतर्गत मूल्यांकन हे कृती युक्त अध्ययन पद्धतीनुसार आखले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध उपक्रम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही कस लागणार आहे.