अंजीत-मंजीतची सहल

Story: छान छान गोष्ट |
19th May, 07:32 am
अंजीत-मंजीतची सहल

अंजीत आणि मंजीतच्या आई-पप्पांनी शनिवारची ऑफिसला सुट्टी घेतली होती. अंजीत मंजीतला मे महिन्याची सुट्टी होती म्हणून आज ते सगळेच म्हणजे अंजीत, मंजीत, त्यांचे आई-पप्पा आणि अम्माज्जी बोंडला अभयारण्यात सहलीला जाणार होते. अंजीत-मंजीतने अगदी उत्साहात सकाळी सकाळी साडे सहाला उठून आई पप्पांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला. आंघोळ वगैरे भराभरा उरकून सगळे पटापट तयार झाले. अम्माज्जी आणि पप्पांनी मिळून सिमी (कुत्रा) तसेच घरातील मिली (मांजर) यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. घराला व्यवस्थित कुलूप लावून, सिनी-मिलीला टाटा बाय-बाय करीत सगळे पिकनिकला जायला निघाले. 

वाटेत छानश्या हॉटेलमध्ये सर्वांनी पोटभर नाश्ता केला. अंजीत-मंजीतला कधी एकदा बोंडला अभयारण्यात पोहोचतो असे झाले होते. बोंडला अभयारण्याचा निसर्गरम्य परिसर सगळ्यांना खूप आवडला. बागेत फुललेली गुलाब, जास्वंद, कण्हेरी, अबोली, या फुलांवर बागडणारी फुलपाखरे तर खूप छान सुंदर दिसत होती. दुपारी सगळ्यांनी एकत्र बसून सहभोजन केले. त्यांच्या आईने खास घरात बनवून त्यांच्यासाठी पुलाव, छोले, चपात्या आणल्या होत्या. शिवाय स्टीलची ताटे, चमचे आणि लोटे सुद्धा आणले होते. मुलांनी जेवणानंतर खाल्लेल्या सगळ्या चॉकलेटच्या गोळ्यांची आवरणे अंजीत-मंजीतच्या आईने एका पेपरमध्ये गुंडाळून कचराकुंडीत टाकली. त्यानंतर आई, पप्पा, अम्माज्जी विसावा घेईपर्यंत अंजीत-मंजीत बागेत आलेल्या मुलांसोबत खूप खेळले.

दमल्यानंतर सारी मुले विसावा घेत होती इतक्यात एक छोटेसे माकडाचे पिल्लू त्या बाजूला आले. मंजीतने उत्साहात हातातील फ्रुटी त्याला देऊ केली इतक्यात त्याच्या आईने त्याला अडवले. “बेटा ते त्याचे अन्न नाही. त्याला ती फ्रुटी देऊ नकोस. त्या ऐवजी त्याला हे केळं दे.” हातात केळं पडताच ते पिल्लू पटदिशी उडी मारून झाडावर त्याच्या आईजवळ गेले. सर्व मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. 

दुपार उलटतात सगळेच प्राणीसंग्रहालय पाहायला गेले. वाघ, हरण, कोल्हा, हत्ती, मगर असे बरेच प्राणी वेगवेगळ्या पिंजऱ्यात होते. पिंजऱ्याला हात लावू नका, प्राण्यांना इजा पोहोचवू नका अशा पाट्या बघत ते पुढे पुढे जात होते. हरणांचा बागडणारा तो कळप तर मंजीतला खूप आवडला. पिंजर्‍याजवळ जेथे अंजीत उभा होता तिथे हरणाचे एक छोटेसे गोंडस पिल्लू येताच अंजीतने त्याला आपल्या खिशातलं बिस्कीट देऊ केलं. इतक्यात त्याच्या पप्पांनी त्याला अडवले व खास माणसांसाठी प्रक्रिया केलेले अन्न जनावरांसाठी, पक्षांसाठी खूप अपायकारक, हानिकारक असते हे सविस्तर समजावले. बाबा पुढे म्हणाले, “अजित बेटा, आपल्या घरातच बघ ना... आपण सिनीला 'पेडिग्री', चिकन देतो परंतु मिलीला कच्चे मासे तसेच भात-माशांचे कालवण देतो. प्रत्येक मांसाहारी तसेच शाकाहारी प्राणी-पक्षांचे अन्न वेगवेगळे असते. ते आपण समजून घ्यायला हवे. सर्व पक्षी, प्राणी, पाखरांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे." 

बोंडला अभयारण्यात मौज-मजा करून दमून-भागून घरी येईपर्यंत अंधार पडला होता. आंघोळ करून आईच्या हातची गरमागरम खिचडी जेवून अंथरुणात पडतात अंजीत मंजीत निद्रेच्या अधीन झाले.


 शर्मिला प्रभू , फातोर्डा मडगाव, ९४२०५९६५३९