वळवाचा पाऊस

महिन्याभराच्या उष्माघाताने काल शेवटी आपलं मौन सोडलं आणि सोसाट्याच्या वाऱ्याची तुतारी वाजवतच तो एकदम अचानक येऊन दारी कोसळू लागला. उन्हाने अगदी जीव नको नकोसा झालेला. घामाच्या धारांनी अंग चिंब ओलेतं होत होतं आणि त्याचं असं हे येणं तनामनाला सुखावत होतं.


18th May, 05:14 am
वळवाचा पाऊस

अगदी थोड्याच वेळापूर्वी काही कल्पना नसताना आकाशात ढगांनी गर्दी केली. बेभान वारं सुटलं, दारं-खिडक्या तडातड वाजू लागली. आयाबायांची त्रेधातिरपिट उडाली. बाहेर सुकत घातलेली वाळवणे, मिरच्या, साठवणीच्या गोष्टी, कपडे सारेच भराभर घरात घ्यावे लागले. झाडांची सुकलेली पाने जमिनीवर पडून गोलगोल 'रिंगा घालू या गं पिंगा' म्हणत फेर धरू लागली. मळभ दाटून आलं आणि बघता बघता टपोरे पाण्याचे थेंब तडतड ताशा वाजवत पत्र्यांवर, घरांवर, छपरांवरून धिंगाणा घालू लागले. रस्त्यावरून चालणाऱ्यांना उसंतच नाही मिळाली. जिथे आडोसा दिसेल तिथे ती उभी राहिली गपचूप. कारण छत्री कुठे घेतली होती बरोबर? पावसाचा अंदाजच नव्हता ना! जणू अचानक दारी अवतरलेला पाहुणा. 

उन्हाने तापून तापून कोरडी झालेली माती पडणारे पावसाचे थेंब घटाघटा पिऊ लागली. जणू कधीची ती तहानलेली होती. भिजलेली माती मंद सुगंध अंगणी पसरवत गंधवती झाली, ढगांचा एकमेकांबरोबर टकराटकरीचा खेळ चालू झाला आणि त्या गडगडाटाने लहान मुलेच काय, मोठी माणसे पण घाबरली. आमची मनी, भुभू घराच्या ओवरीत घाबरून निपचित पडून राहिले. कारण विजांचा लखलखाटही सुरू झाला होता. आभाळात क्षणात इकडे तर क्षणात तिकडे अशा विजेच्या चमचम करणाऱ्या रेषा आपली नक्षी उमटवत होत्या. पावसाच्या माऱ्याने काही झाडे तर चक्क आडवी पडू लागली होती. काही ताठ उभं राहायचा प्रयत्न करूनही ती लवत होती. वारा भान विसरून एखाद्या वांड वासरागत इकडून तिकडे हुंदडत येत होता. जुई, मोगरा, तगर, सायलीच्या नाजूक फुलांचा बहर पाण्याच्या माऱ्याने गळून गेला. गुलमोहराच्या झाडाखाली तर त्याच्या शेंदरी तांबूस पाकळ्यांनी जणू गालिचाच अंथरला होता. 

बागेत, अंगणात खेळायला गेलेली बच्चेकंपनी मस्तपैकी पावसाच्या धारा अंगावर झेलत पाऊस एंजॉय करत होती. आज त्यांच्या आया पण त्यांना अडवताना दिसत नव्हत्या. वळवाच्या पावसात भिजल्याने अंगावर उन्हाळ्यात आलेलं घामोळं बरं होतं म्हणतात, शरीराची वाढलेली उष्णता या पाण्याने कमी होते. मग काय? त्यांच्या मस्तीला चेव आला होता नुसता. काहीच ध्यानी मनी नसताना असं पावसाचं अवचित येणं आणि मग निवाऱ्याला किती वेळ उभं राहणार? पाऊस काही लवकर थांबायचं चिन्ह दिसेना, मग वळचणीतून बाहेर पडलेली माणसे, सरळ  पाऊस अंगावर झेलत रस्त्याने चालू लागली. पावसाच्या गारगार माऱ्याने तनमन चिंब-चिंब ओले करून घेत होती. मुले, माणसे, बाया ज्या बाहेर पडताना तयारीत निघाल्या नव्हत्या त्यांना काय, पावसात भिजण्याचं एक निमित्तच मिळालं. 

आपल्या तान्हुल्या बाळाला पहिला पाऊस दाखवायला आई बाहेर घेऊन आली. मातीची पुटे चढलेली झाडे, वेली, पाने स्वच्छ धुवून निघल्याने त्यांची हिरवाई चमकू लागली. एका पावसाने इतका सारा चमत्कार घडवला होता. तळपत्या ऊन्हानंतर तापलेल्या धरणीला शांत-क्लांत करणारा, तिची तृप्तता करणारा, सुगंध पसरवणारा, मनाला गारवा आणि तनाला थंडावा देणारा वळवाचा पाऊस आनंदाची, सुखाची बरसात करणारा. प्रेमात नव्याने पडलेल्या प्रेमीजनांना तर हा पाऊस म्हणजे त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार. एका छत्रीत मुद्दाम ओलेती अंगे घेऊन एकमेकांचा अंगस्पर्श अनुभवण्याची, प्रेमात चिंब-चिंब होऊन जाण्याची, हा पाऊस जणू संधीच देत असतो. शहारलेली मने आणि गारव्याने अंगावर काटा फुलवणारी थंडी या दोन्हींचा संगम झाला की जी जादू घडते ती कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखी असते. ‘जिंदगी भर नही भुलेगी|वो बरसात की रात’ असा तो अनोखा आणि हवाहवासा वाटणारा अनुभव आपल्या हृदयी एखादी ठेव जपून ठेवावी तसा ठेवला जातो. वळवाचा हा पाऊस येतानाच असा एखाद्या धसमुसळ्या प्रियकरासारखा येतो आणि क्षणभरात प्रेमाची धुवाधार बरसात करतो. 

वळवाचा पाऊस म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येतो तो लहानपणी पाठ्यपुस्तकातला धडा 'वळवाचा पाऊस'. गरीब झोपडीत राहणारी एक आई तिचं एक तान्हुलं बाळ घरात झोपलेलं असतं आणि तिला बाजारात जाऊन मीठ-मिरची सामान आणायला जायचं असतं. घरात आणखी कुणीच नसतं. बाळ झोपलंय तोपर्यंत परत येऊ या विचाराने ती झपाझप पावले टाकीत बाजाराकडे निघालेली असते. बाळाला तिने एका पाटलीत निजवलेलं असतं. ती अर्ध्या वाटेवर येते आणि वळवाच्या पावसाची लक्षणे दिसू लागतात. सोसाट्याचा वारा सुटतो ढग गडगडू लागतात. तिचं सारं लक्ष तिच्या बाळाकडे लागलेलं असतं. पाऊस सुरू होतो तशी ती बाजारात न जाता परत फिरते. बाळाची काळजी वाटू लागते कारण तिची झोपडी चंद्रमौळी असते. पावसाचे पाणी घरात गळेल म्हणून ती धावतच भिजत घरी परतते आणि दार उघडते तो बाळ टोपलीत निवांत झोपलेलं असतं पण टोपली शेजारीच एक भलं मोठं छपरावरचं कौल वरुन खाली पडलेलं असतं. ते जरा चुकलं नाहीतर बाळाला मोठी दुखापत झाली असती, या विचाराने ती बाळाला आपल्या हृदयाशी कवटाळते. ही खरी आई आणि तिची आपल्या लेकराविषयीची माया.

वळवाच्या पावसाच्या माझ्या लहानपणीच्या पण काही आठवणी अगदी लक्षात आहेत. एक तर आम्ही राहायचो तो मोठा चौसोपी वाडा होता. मध्यभागी मोठे अंगण होते. सुट्ट्या पडल्या की आमचा मुक्काम घरात कमी, अंगणात जास्त असा असायचा. मे महिन्यात साधारणत: वळवाच्या पावसाची हजेरी लागायची. मग अंगणातली माती ओली व्हायची. त्या मातीत आम्ही 'कोटं' बनवायचो. 'कोटं' म्हणजे पर्वतीसारखी एक टेकडी. त्यावर जाणाऱ्या पायऱ्यांकडेचा रस्ता, तिथे लावलेली फुलझाडे, बसायला बेंचेस असा सुंदर देखावा तयार व्हायचा. बघायला वाड्यातले प्रेक्षक  असायचेच. देखावा सजवायला गुलमोहोराच्या पाकळ्या, बुचाची लांब देठाची फुले, काड्याकाटक्या असा सगळा निसर्गातलाच माल. संध्याकाळपर्यंत सुंदर बाग आणि कोटं तयार करण्यात आमचा वेळही छान जायचा. 

आता यातला वाडा, अंगण सारे भूतकाळात जमा झाले. पण आठवणी वळवाच्या पावसाने जाग्या केल्या. पुण्यासारख्या ठिकाणी या पावसात हमखास गारा पडतात आणि त्या गारा वेचायचा कार्यक्रम तर अगदी आठवणीत राहण्यासारखा. गोव्याला मी कधी गारा पडताना अनुभवलं नाही. पण लहान असताना सुट्टी पडली म्हणून बहिणीसोबत पेशवे पार्कला फिरायला गेले होते आणि तिथे अचानक या वळवाच्या पावसाने गाठले.  कुठेही आडोसा नसल्याने खूपच पंचाईत झाली होती. त्यात गारा पडू लागल्या. त्यातली एक टपोरी गार माझ्या डोक्यात पडली आणि चांगलं टेंगूळ आलं होतं आणि मी रडून आकांत केला होता ही गोष्टही लक्षात राहिली. तरीही वळवाचा पाऊस हा सर्वांसारखा मला पण हवाहवासा वाटतो. तापलेल्या, तहानेने कासावीस, व्याकुळ झालेल्या भुईला तो आपल्या वर्षावाने तृप्त करतो. त्याचं येणं हे वरदान वाटतं.


प्रतिभा कारंजकर, फोंडा- गोवा.