काजू महोत्सव उत्पादकांना दिलासादायक उपक्रम...

सत्तरी सांगे, केपे, काणकोण, डिचोली अशा महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये काजू उत्पादन हा महत्त्वाचा उदरनिर्वाहाचा स्तोत्र आहे. यंदा काजूचे उत्पादन ५०% नी घटले असल्याचे कृषी खात्याने मान्य केले आहे. काजू उत्पादकांना याचा थेट फटका बसल्याने सरकारने काजू दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. यामुळे एका बाजूने काजूचे उत्पादन कमी होणे व दुसऱ्या बाजूने हा महोत्सव साजरा होणे यातून काजू उत्पादकांना सरकारच्या निर्णयाची अपेक्षा आहे.

Story: भवताल |
12th May, 06:26 am
काजू महोत्सव उत्पादकांना दिलासादायक उपक्रम...

काजूचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे होत नाही असा काजू महोत्सवाच्या तज्ञ मंडळीचा एकंदर सूर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तज्ञ मंडळीकडून केलेल्या काही सूचनांचे पालन केल्यास गोव्यामध्ये काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्याचप्रमाणे हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल याच्या पलीकडे जाऊन हायब्रीड पद्धतीने काजूची लागवड केल्यास त्यातून चांगल्या प्रकारचा फायदा होऊन हवामानापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. मात्र त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केल्यास येणाऱ्या काळात काजू उत्पादकांना चांगल्या प्रकारचा दिलासा मिळू शकतो. कारण काजू उत्पादन हे हजारो कुटुंबीयांच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे जो मजबूत होणे गरजेचे आहे. 

डॉक्टर दिव्या राणे यांच्याकडे वनविकास महामंडळाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी या महामंडळाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षापासून काजू महोत्सवाचे आयोजन करून काजू उत्पादन व काजूपासून तयार होणाऱ्या अनेक उत्पादनाला चांगल्या प्रकारची संधी, जागतिक स्तरावर बाजारपेठ, या उत्पादनाला चांगल्या प्रकारची मागणी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यातूनच गेल्यावर्षी काजू महोत्सवाचा जन्म झाला तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वनखात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत या काजू महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हापासूनच काजू महोत्सव व काजूचे उत्पादन या संदर्भात सखोलपणे विचार करण्याचे पर्व सुरू झाले. 

आज टप्प्याटप्प्याने काजू उत्पादनात वाढ, काजूबियांची तसेच काजूच्या बोंडूची मागणी वाढावी, काजूच्या बोंडूपासून अनेक प्रकारची शीतपेये तयार व्हावीत, फेणीला जीआय टॅग प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले याला बऱ्याच प्रमाणात यश आलेले आहे. यामुळे वनविकास महामंडळाने सुरू केलेला हा अनोखा व महत्त्वाचा प्रकल्प येणाऱ्या काळात गोव्यातील काजू उत्पादकांबरोबरच गोव्यातील संबंधित नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचा ठरणार आहे. 

गोव्याच्या अनेक भागांमध्ये वनविकास महामंडळाच्या जमिनीमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र मध्यंतरी या लागवडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, व्यवस्थापनाकडे सहसा कोणी लक्ष दिले नसल्यामुळे या लागवडी आजही नावापुरत्या शिल्लक राहिलेल्या आहेत. काजू महोत्सवाच्या माध्यमातून या जमिनीकडे वनविकास महामंडळाने लक्ष देऊन या भागात नव्या पद्धतीने काजू झाडांची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात यातून काजूचे उत्पादन होऊ शकते कारण ज्या ठिकाणी या जमिनी आहेत त्या काजू लागवडीसाठी पोषक आहेत. 

सत्तरी तालुक्यातील हजारो चौरस मीटर वनविकास महामंडळाच्या ताब्यात जमिनी आहेत. या जमिनीवर नव्या पद्धतीने काजूचे लागवड करावी त्याचे व्यवस्थापन करावे. हायब्रीड पद्धतीने काजूची लागवड केल्यास त्यातून प्रोत्साहन मिळून नव्या पद्धतीच्या लागवडी येणाऱ्या काळात गोव्यामध्ये जन्माला येऊ शकतात. संपन्न झालेल्या काजू महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात व याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या काजू लागवड, काजूचे व्यवस्थापन, हवामानापासून काजूचा बचाव या संदर्भात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या माध्यमातून काजूची लागवड व त्याचे व्यवस्थापन व जास्तीतजास्त प्रमाणात काजूचे उत्पादन कशा प्रकारे घेता येईल यावरही विचार मंथन करण्यात आले. 

गोव्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली लागवड व सध्याची काजू कलमांची लागवड यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काजू कलमांची लागवड ही पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. काजूची लागवड करण्यात आल्यानंतर अवघ्या चार वर्षानंतर काजूच्या उत्पादनाला सुरुवात होते. त्यानंतर फक्त चार ते पाच वर्षे चांगल्या प्रकारे उत्पादन देतात त्यानंतर मात्र या काजूच्या कलमांची लागवड अयशस्वी ठरते त्यामुळे काजू कलमांचा पुरवठा करताना शेतकऱ्यांची फसवणूक तर होणार होत नाही ना अशा प्रकारचा सवाल आता काजू  उत्पादकांकडून विचारला जात आहे.  गेल्या काही वर्षापासून करण्यात आलेली काजू लागवड फोल ठरल्यामुळे पुन्हा एकदा गावठी काजूच्या झाडांच्या लागवडीकडे काजू उत्पादक भर देऊ लागलेले आहेत. काजूची लागवड व त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पादन कशाप्रकारे होऊ शकते या संदर्भात करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या माध्यमातून त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकी खात्याचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. फक्त काजू महोत्सवापुरतेच चर्चासत्रामध्ये भाग घेऊन काजू उत्पादकांना उपदेश करण्याऐवजी प्रत्यक्षपणे त्यांच्या हातामध्ये हात घालून त्यांना भेडसावणारे  प्रश्न व निर्माण होणाऱ्या समस्या यांना वाट मोकळी करून देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकी खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे ही सुद्धा काळाची गरज आहे. 

काजू महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मंत्री गोविंद गावडे यांनी तरुणांनी या लागवडीकडे विशेष लक्ष द्यावे अशा प्रकारची विनंती केलेली आहे. मात्र जोपर्यंत काजू उत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला दिलासादायक अर्थप्राप्ती होण्याची शाश्वती निर्माण होणार नाही. तोपर्यंत तरुण वर्ग याकडे लक्ष देणार नाही ही खरी परिस्थिती आहे. यामुळे वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तरुण वर्गाला यामध्ये आवड निर्माण करण्याची जबाबदारी ही शेतकी खात्याची आहे. 

गेल्या दोन वर्षापासून सरकारने शेतकी खात्याच्या माध्यमातून काजू उत्पादकांना आधारभूत किंमत जाहीर केलेली आहे. मात्र त्याची प्रक्रिया ही कटकटीची आहे. आधारभूत किंमत तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. आधारभूत किंमत जरी जाहीर करण्यात आली तरी त्याची रक्कम वेळेवर मिळत नाही ही खरी खंत आज प्रकर्षाने जाणवत आहे. काजू महोत्सवाच्या माध्यमातून काजू उत्पादन व काजूच्या अनेक उत्पादनापासून निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स या संदर्भाची जाणीव काजू उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. महोत्सवाच्या माध्यमातून सरकारने ते करावे. कारण काजू महोत्सव आयोजन करण्यामागचा हाच हेतू आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. 


उदय सावंत, वाळपई