खेळता खेळता आरोग्यही

उन्हाळ्याचा परिणाम म्हणून नेहमीच मुलं स्वभावाने चिडचिडी होतात ज्यामुळे ती नीट खाऊही शकत नाहीत आणि नीट खेळूही शकत नाहीत. अशावेळी औषधांशिवाय मुलांचा स्वभाव कसा खुलवावा यासाठी वेगवेगळ्या खेळांची मदत घेऊन पालक त्यांना रमवू शकतात.

Story: पालकत्व |
11th May, 12:49 am
खेळता खेळता आरोग्यही

निसर्गाचे सानिध्य 

जी मुलं सकाळची जास्त बाहेर जात नाहीत त्यांना विटामिन डीची कमतरता भासते. अशावेळी सुट्टीत मुलांना गॅजेट्स देणे बंद करून त्यांना उन्हाचा आनंद मिळावा म्हणून त्यांना सकाळी घराबाहेर घेऊन जा. मुलांची स्वतःची कल्पनाशक्ती विस्तृत करण्यासाठी त्यांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून नवनवीन चित्रे बनवण्यास प्रोत्साहित करा. 

पाककला शिकवा 

नवनवीन चवी मुलांच्या जिभेवर रुळण्यासाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी असे उन्हाळ्यासाठी उपयुक्त पदार्थ बनवा. युट्यूब, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून किड्स फूड ऍक्टिव्हिटी असतात. त्यांची मदत घेऊन तुम्ही त्यांच्यासाठी कुकीज, मफिन्स, सॅलड्स, पराठे, कटलेट्स बनवण्यासाठी त्यांनाच गुंतवून घ्या. अशाने खेळाखेळात मुलं स्वतःसाठी स्वतःच पदार्थ बनवायला शिकतील आणि स्वावलंबी होतील.

इनडोर गेम्स खेळा  

उन्हाळ्यात जास्त ऊन असल्यानंतर घराबाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे घरातच आपल्या मुलांना खेळण्यासाठी आणि घरातल्या घरातच फिरून खेळू शकतील अशा प्रकारे खेळणी आणि कोड्यांसह काही मजेदार खेळ नक्कीच खेळा. त्यासोबतच मुलांना कागद, गोंद, कैची आणि अन्य मुलांसाठी सुरक्षित असलेल्या सामग्रीचा उपयोग करून क्राफ्ट डी आय वाय शिकवा. पुस्तक वाचण्यात किंवा त्यांच्यासोबत लपाछपी खेळण्यात वेळ घालवा. संगीत, नृत्य किंवा कोणतीही कला, नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा. 

शैक्षणिक गेम्स आणि अॅप्स 

लहान मुलांना इंटरॅक्टिव्ह, वयापरत्वे शैक्षणिक सामग्री द्या. असे केल्याने मुलांना खेळता खेळता कितीतरी महत्त्वाचे उपयुक्त ज्ञान मिळते. यासोबत तुम्ही मुलांबरोबर स्वतःचा वेळ घालवा जेणेकरून मुलांना एकटेपणा वाटणार नाही आणि मुलं तुमच्याशी बोलता-बोलता कितीतरी गोष्टी शिकून जातील. ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, अ आ इ किंवा अंक ओळख, पाढे अश्या गोष्टी त्यांच्याशी बोलता बोलता तुम्ही त्यांना शिकू शकता. त्यांचे मनोरंजनही होईल आणि त्यांना ज्ञानही मिळेल अशाप्रकारे त्यांच्याशी संवाद साधा. 

फॅमिली गेट-टुगेदर 

घरात असे वातावरण बनवा की मुलांना वेळेवर नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण मिळेल. अधूनमधून त्यांना प्रेरक चित्रपट, संगीत, नृत्य किंवा खेळ शिकवा. त्यांना अशा गोष्टी ऐकवा ज्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. त्यांच्या भावना, ध्येय आणि स्वप्नांविषयी त्यांच्याशी चर्चा करून एक मजबूत भावनात्मक बंध तयार करा. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातले किंवा नात्यातल्या पाहुण्यांना आपल्या घरी आमंत्रित करा जेणेकरून मुलं सर्वांशी मिळून मिसळून राहतील.

दिनचर्येचा नियम 

घराच्या आत राहूनही मुलांसोबत एक आरोग्यदायी आणि उपयुक्त अशी दिनचर्या तयार करा जसे की संध्याकाळी किंवा सकाळी गॅलरीत किंवा घराच्या बागेत छोटीशी फेरी मारून येणे, किंवा माईंडफुलनेस व्यायाम करणे. मुलांना चांगले संस्कार द्या जसे की देवापुढे प्रार्थना करणे, कामात मदत करणे, वस्तू व्यवस्थित ठेवणे, बागकाम करणे इत्यादी. 


स्नेहा सुतार