एग फ्रिजींग प्रक्रिया काय असते?

आजच्या आधुनिक काळात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. आजकाल पुरूष व महिला, दोन्ही वर्गाला आपला जॉब व करिअर महत्त्वाचे असते. त्यामुळे अगदी तिशीत असून, बहुतांश वेळा करिअर पीक वर असल्याने लग्न, मूल यांना प्राधान्य दिले जात नाही. अशा वेळेस आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात, बाळ हवे असल्यास महिलेला एग फ्रीजिंगच्या मदतीने आई बनण्याची संधी मिळू शकते.

Story: आरोग्य |
12th May, 06:04 am
एग फ्रिजींग प्रक्रिया काय असते?

महिला आपल्या वयाच्या साधारणपणे विशी-तिशीत जास्त प्रजननक्षम मानल्या जातात. या वयात करिअरमध्ये भरारी घेत असताना गर्भधारणा झाल्यास करिअरमध्ये खंड पडू शकतो, असा विचार करत अनेक महिलांना या वेळेस मातृत्व नको असते, पण काही वर्षानंतर त्यांची गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. तसेच शरीरात काही त्रास निर्माण झाल्यास तिशीनंतर गरोदरपणात अडथळे निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत उपयोगी ठरते ती एग फ्रीजिंग प्रक्रिया. 

सीरम ए.एम.एच. ही तपासणी आपल्याला महिलेच्या जननक्षमतेची नेमकी कल्पना देते. हे हार्मोन एग्सची संख्या चांगली राहावी म्हणून काम करते. याचे प्रमाण कमी झाले की एग्स वेगाने कमी होतात. प्रत्येक महिलेच्या शरीरातील बीजकोशात मासिकपाळी आल्यापासून ते साधारण ४५ वयापर्यंत म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत दर महिन्याला एग फलित होत असते, त्यामुळे गर्भधारणा शक्य होते. पण प्रत्येक महिन्यात तयार होणारे एग हे फ्रीज करण्यायोग्य किंवा गोठवण्यास योग्य नसल्यामुळे कोणत्या महिन्याचे एग जपून ठेवायचे हे तपासणीनंतर कळते. 

एग फ्रीजिंग कसे केले जाते?

एग/स्त्रीबीज फ्रीजिंगसाठी पाळीच्या पहिल्या दिवसापासून इंजेक्शन्सला सुरुवात होते. ही वेगवेगळी इंजेक्शन्स बारा ते पंधरा दिवसांपर्यंत चालू राहतात. सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा एग्स मिळावीत अशी अपेक्षा असते. एग्स पुरेशी परिपक्व झाली की अजून एक इंजेक्शन दिले जाते. मग काही तासांनी भूल देऊन सोनोग्राफीच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक छोट्या शस्त्रक्रियेद्वारे ही एग्स काढून घेतली जातात. नंतर मायक्रोस्कोपमधून तपासली जातात आणि मग ही एग्स सबझिरो तापमानात गोठवली जातात.

एग्स लिक्विड नायट्रोजन असलेल्या फ्रिझरमध्ये १९६ डिग्री तापमानाला अनेक वर्षापर्यंत गोठवता येऊ शकतात. भविष्यात जेव्हा एखाद्या महिलेला आई व्हायची इच्छा असते तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे ते एग फलित करून महिलेच्या शरीरात दाखल केले जाते. यामुळे गर्भधारणेचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते व बाळ अगदी सुदृढ जन्माला येऊ शकते. 

जेव्हा शरीरात पुन्हा एग स्थलांतरित केले जाते तेव्हा महिला एक आठवड्यानंतर आपले नियमित काम सुरू करू शकतात. पण प्रत्येक महिलेचे शरीर हे वेगळे असते. त्यामुळे काही जणींचे वजन झपाट्याने वाढू शकते व शारीरिक त्रासही होऊ शकतो. एग फ्रिजिंगनंतरही शरीरामध्ये अजून एग्स राहिल्याने महिला गरोदर होण्याची शक्यता नक्कीच असते. 

एग फ्रीजिंग कोणासाठी उपयुक्त?

ज्या महिलांना सध्या गर्भधारणा नको आहे, मात्र भविष्यात गर्भधारणेच्या आपल्या क्षमतेबद्दल खात्री हवी आहे, अशा महिला एग फ्रीजिंगचा सुरक्षित पर्याय निवडू शकतात. तसेच, ज्या महिलांना अनुवांशिक रोग, कॅन्सर, किंवा इतर संसर्गाशी संबंधित रोग असतात, ज्यांचे अवयव निकामी असतात, किंवा वैद्यकीय कारणांमुळे गर्भधारणा उशिरा होते, त्यांच्यासाठी एग फ्रीजिंग हा एक चांगला उपयुक्त पर्याय ठरू शकतो. कारण कर्करोग किंवा त्यासाठी होणारे औषधोपचार, किमो थेरपी अथवा रेडिओथेरपीमुळे बीजकोशावर परिणाम होऊन एग तयार होण्याची क्षमता गमावण्याची भीती असू शकते. एखाद्या कुटुंबात रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होणे हे कमी वयात होत असेल, त्या महिलांसाठीही हा पर्याय लाभदायक ठरू शकतो.

एग फ्रीजिंग प्रक्रिया तंत्रज्ञानाचे वरदान असले तरी याचे काही दुष्परिणामही असू शकतात.

वयाच्या चाळीशीनंतर गर्भवती महिलांमध्ये, अपूर्ण दिवसात प्रसुती होणे, गर्भावस्थेत मधुमेह होणे याचे प्रमाण अधिक आढळून येऊ शकते.

प्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव, संसर्ग आणि मूत्राशय किंवा ओटीपोटाच्या अवयवांना इजा होण्याचा धोका असू शकतो. मूड स्विंग्स, डोकेदुखी, ओटीपोटात वेदना होणे, वजन वाढणे, मळमळ होणे तसेच जिथे इंजेक्शन दिले आहे, तिथे तीव्र वेदना होणे, असा त्रास सहन करावा लागू शकतो.

३५-४० व्या वर्षानंतर प्रथमच आई झालेल्या महिलांना संगोपन अधिक चांगल्या पद्धतीने जमत असले तरी उशिरा वयात गरोदरपणाचे धोके अधिक असू शकतात. 


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर