निरूपडी कडकालचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18th April, 12:39 am
निरूपडी कडकालचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

म्हापसा : पर्वरी येथील कामाक्षी उड्डापनोव (३०) या युवतीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी निरूपडी शंकराप्पा कडकाल (रा. सुकूर) याचा या प्रकरणातील दोषमुक्त करण्याचा अर्ज सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांनी फेटाळून लावला.

कामाक्षी या युवतीच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नाही आणि आरोपपत्रात या संदर्भात कोणताही पुरावा नाही. तसेच आंबोली घाट (महाराष्ट्र) येथे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात व पुरावा नष्ट करण्यात आपण कोणतीही सक्रीय भूमिका बजावली नाही. त्यामुळे आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, अशी याचना न्यायालयात संशयित निरूपडी कडकाल याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या २७७ कलमाअंतर्गत अर्ज सादर करून न्यायालयाकडे केली होती.

सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, संशयित आरोपी फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड (रा. सुकूर) याने कामाश्री उड्डापनोव हिचा खून केला आणि नंतर संशयित निरूपडी कडकाल याच्या मदतीने कारमधून तिच्या मृतदेहाची आंबोली येथे नेऊन विल्हेवाट लावली. शिवाय घटनेच्या दिवशी संशयित निरूपडी हा आपला मुलगा संशयित प्रकाश याच्यासोबतच होता, असा कबुली जवाब संशयिताच्या आईने दिला आहे. त्यामुळे या खून व पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यात अर्जदार संशयिताचा सहभाग दर्शवितो. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची विनंती त्यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने वरील निवाडा दिला.

दरम्यान, हा खुनाचा प्रकार ३० सप्टेंबर २०२३ रोजी घडला होता. तर ३१ रोजी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी तसेच युवतीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड याला अटक केली होती. तर दुसर्‍या दिवशी १ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांनी संशयित आरोपी निरूपडी कडकात यास अटक केली होती. दोन्ही संशयितांना घेऊन पोलिसांनी युवतीचा आंबोली घाटात टाकलेला मृतदेह शोधून काढला होता.