ग्लेन टिकलो यांची खोटी तक्रार न्यायालयाने फेटाळली

तब्बल १२ वर्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाला न्याय : फेरेरा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st May, 12:26 am
ग्लेन टिकलो यांची खोटी तक्रार न्यायालयाने फेटाळली

म्हापसा येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अॅड. कार्लुस फेरेरा. सोबत इतर. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : गेल्या मार्च २०१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी काँग्रेसचे उमेदवार व सदस्यांकडून पैशांचे वाटप झाल्याचा दावा करीत खोटी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार तथ्यहीन असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुराव्याअभावी फेटाळले असून १२ वर्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची माहिती हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी दिली.

मंगळवारी म्हापसा येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निकलस डायस, दिलीप हळदणकर, लेनी डिसोझा, चंदन मांद्रेकर उपस्थित होते.             अॅड. फेरेरा म्हणाले, ग्लेन टिकलो यांनी माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यासह एकूण १२ जणांविरोधात वरील तक्रार दाखल केली होती. त्यांच्या दाव्यानुसार संबंधितांकडून आचारसंहितेच्या काळात लोकांना पैसे वाटप सुरू होते. मात्र, टिकलो हे घटनास्थळी त्यादिवशी हजर नव्हते. तरीही टिकलो यांनी खोटी तक्रार केली, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टरीत्या नमूद केले आहे. या खोट्या तक्रारीमुळे या १२ लोकांना अकारण मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच न्यायालयाच्या फेऱ्याही माराव्या लागल्या. राजकीय लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करू नये, असा सल्ला अॅड. फेरेरा यांनी दिला.

हळदोणा मार्केट कॉम्प्लेक्सविषयी अॅड. फेरेरा म्हणाले, माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी मार्केटच्या पुनर्बांधणीसंदर्भात कधीच तत्त्वत: प्रस्ताव किंवा मान्यता मिळवली नाही. पण आपल्या कार्यकाळातच हळदोणा मार्केटच्या नूतनीकरणास मान्यता मिळाल्याचा दावा ते करीत आहेत. सध्या टिकलो यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप फेरेरा यांनी केला.     

कायदा-सुव्यवस्था ढासळण्यास गृहमंत्री जबाबदार 

निवडणुकीच्या काळात राज्यात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. घरांपासून आता मंदिरांपर्यंत चोर पोचले आहेत. श्री बोडगेश्वर मंदिरात झालेल्या चोरीवरून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून लोक भयभीत झाले आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्यांची असते. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निर्देश देत पोलिसांवर वचक ठेवायला हवे, असे अॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले.