थिवी पंच सदस्यावर गुन्हा नोंद

सरपंच, उपसरपंचांना शिवीगाळ, धमकी प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 12:08 am
थिवी पंच सदस्यावर गुन्हा नोंद

म्हापसा : थिवीचे सरपंच व उपसरपंचांना अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करून विनयभंग व गंभीर परिणामाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी पंच सदस्य तथा माजी सरपंच अर्जुन आरोसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

उपसरपंच अॅड. हर्षदा कळंगुटकर यांनी या प्रकरणी पोलिसांत बुधवार, दि. २४ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित पंच सदस्य आरोसकर यांच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या ५०४, ५०६ व ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

हा प्रकार बुधवारी दुपारी १२.३० वा. सुमारास पंचायत मंडळाच्या मासिक बैठकीवेळी घडला होता. संशयित पंच सदस्य आरोसकर यांनी सादर केलेल्या कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या फाईल्स मंजूर करण्यास सरपंच व्यंकटेश शिरोडकर यांनी नकार दिला होता. या कारणावरून संशयित आरोसकर यांनी सरपंचांशी वाद घातला, सरपंच व मला घाणेरड्या व अर्वाच्छ शब्दांत शिविगाळ केली, गंभीर परिणामाची धमकी देत मला बळजबरीने धक्का दिला. संशयित आरोपी हा पूर्णपणे त्रस्त, हताश आणि व्यथित झालेला असून तो कायदा हातात घेण्याची शक्यता आहे. एखाद्या पंच सदस्याने अशा गुन्हेगारी दबावाने सरपंचाला बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडल्यास सरपंचांना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे कष्टाचे ठरेल. सार्वजनिक कार्यालयाचा वापर करून बेकायदेशीर फाईल्स निकाली काढण्याची सरपंच व उपसरपंचांना धमकी देणे हा एक गंभीर गुन्हा अाहे. कायदा हातात घेण्यापूर्वी संशयित पंच सदस्य अर्जुन आरोसकर यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत उपसरपंच अॅड. कळंगुटकर यांनी केली होती.

तसेच, या तक्रारीसोबत सरपंच व्यंकटेश शिरोडकर, पंच सदस्य शिवदास कांबळी, मायकल फर्नांडिस, गीता शेळके व प्रिती आरोलकर यांनी या घटनेचा लिखित कबुलीजबाब देत संबंधित दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. 

हेही वाचा