अश्लील फोटो दाखवून केले ब्लॅकमेलिंग; मात्र, पुराव्याअभावी सुटला निर्दोष

पाॅक्सो न्यायालयाचा निवाडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th May, 12:02 am
अश्लील फोटो दाखवून केले ब्लॅकमेलिंग; मात्र, पुराव्याअभावी सुटला निर्दोष

पणजी : नाटकावेळी कपडे बदलत असताना अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो काढून नंतर तिच्यावर दबाव टाकून तरुणाने लैंगिक अत्याचार केला. ती प्रौढ झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून सतत तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणात साक्षीदाराच्या साक्षीत तफावत असल्यामुळे तसेच विरोधात वैद्यकीय पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा निवाडा पणजी येथील जलदगती तथा पाॅक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

या प्रकरणी पणजी येथील महिला पोलीस स्थानकात पीडित मुलीने तक्रार दाखल केली. त्यानुसार, एप्रिल २०१६ मध्ये पीडित मुलगी आणि संशयित युवक नाटकात काम करत होता. त्यावेळी नाटकात काम करतेवेळी ती कपडे बदलताना संशयित युवकाने तिचे फोटो काढले. नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर एप्रिल २०१६ ते २१ सप्टेंबर २०१७ दरम्यान ती प्रौढ झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ती दुसऱ्या जातीची असल्याचे कारण समोर करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तसेच संशयित युवकाच्या आई वडिलांचा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. याची दखल घेऊन महिला पोलिसांनी संशयित युवकासह त्याच्या आई वडिलांच्या विरोधात १८ नोव्हेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी युवकासह त्याच्या आई वडिलांना अटक केली असता, न्यायालयाने त्याच दिवशी त्यांची सशर्त जामिनावर सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून २९ मार्च २०१८ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. दरम्यान, १९ जून २०२० रोजी पुराव्या अभावी न्यायालयाने संशयित युवकाच्या आई वडिलांना आरोपातून मुक्त केले. तर प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित युवकाच्या विरोधात ३ जुलै २०२० रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, साक्षीदारांनी न्यायालयात जबाब फिरविला. न्यायालयात संशयित युवकाविरोधात वैद्यकीय पुरावे सादर करण्यात अपयश आले. तसेच सर्व पंच साक्षीदार पीडित मुलीच्या ओळखीचे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयिताची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे.